ऐतिहासिक महाड क्रांतीच्या स्मृतींना डाव्या नेत्यांचा उजाळा

संगमनेर Live
0
ऐतिहासिक महाड क्रांतीच्या स्मृतींना डाव्या नेत्यांचा उजाळा


◻️ चवदार तळे सत्याग्रह आणि मनुस्मृती दहनाचे मुख्य संघटक कॉ. आर. बी. मोरे यांच्या जन्मगावी शिष्टमंडळाकडून अभिवादन

संगमनेर LIVE (​महाड) | भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील दोन महत्त्वाचे टप्पे असलेल्या ‘महाडचा चवदार तळे सत्याग्रह’ आणि ‘मनुस्मृती दहन’ या ऐतिहासिक क्रांतीचे मुख्य सूत्रधार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निकटवर्तीय सहकारी कॉम्रेड आर. बी. मोरे यांच्या दासगाव (ता. महाड) या जन्मगावाला सीपीआय (एम) चे सरचिटणीस एम. ए. बेबी यांनी नुकतीच भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी या ऐतिहासिक चळवळींच्या स्मृतींना उजाळा देत सामाजिक समतेचा जागर केला.

​१९ मार्च रोजी झालेल्या या भेटीत एम. ए. बेबी यांच्यासोबत पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे, मरियम ढवळे, राज्य सचिव डॉ. अजित नवले, आमदार विनोद निकोले, शैलेंद्र कांबळे, प्राची हतिवलेकर आणि किरण गहाळा आदी मान्यवर उपस्थित होते.

​या शिष्टमंडळाने दासगावमधील ती ऐतिहासिक विहीर आणि तलाव प्रत्यक्ष पाहिला, जिथे आर. बी. मोरे यांनी सामाजिक समतेच्या लढ्याची बीजे रोवली होती. कॉ. आर. बी. मोरे यांचे नातू सुबोध मोरे यांनी या स्थळांचे ऐतिहासिक महत्त्व आणि त्या काळातील संघर्षाची सविस्तर माहिती शिष्टमंडळाला दिली.

​शिष्टमंडळाने दासगाव बंदरालाही भेट दिली. हे तेच ऐतिहासिक बंदर आहे, जिथून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडमध्ये प्रवेश केला होता. तीव्र विरोध पत्करून कॉ. आर. बी. मोरे यांच्या नेतृत्वाखाली याच परिसरात ‘मनुस्मृती दहन’ कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. हा ऐतिहासिक क्षण सामाजिक न्यायाच्या लढ्यातील मैलाचा दगड ठरला आहे.
​विशेष म्हणजे, जब्बार पटेल दिग्दर्शित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या जगप्रसिद्ध चित्रपटाचे चित्रीकरणही याच परिसरात झाले होते. ममूटी यांनी बाबासाहेबांची भूमिका साकारलेल्या या चित्रपटात अनेक स्थानिक गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. या आठवणींनाही यावेळी उजाळा देण्यात आला.

​भेटीच्या शेवटी, एम. ए. बेबी यांनी दासगाव येथील ‘कॉम्रेड आर. बी. मोरे माध्यमिक शाळे’ला भेट दिली. यावेळी त्यांनी शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. आर. बी. मोरे यांनी शिक्षणाद्वारे समाज परिवर्तनाचे जे स्वप्न पाहिले होते, ते ही शाळा आजही पुढे नेत असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

​“कॉ. आर. बी. मोरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकत्र येऊन जो लढा उभारला, तो आजही आपल्याला प्रेरणा देतो. दासगाव ही केवळ एक भूमी नसून ती सामाजिक न्यायाची ऊर्जा देणारी कर्मभूमी आहे.” अशी प्रतिक्रिया एम. ए. बेबी यांनी यावेळी दिली.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !