उद्योगापुढील ‘गॅस’ संकट दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू!

संगमनेर Live
0
उद्योगापुढील ‘गॅस’ संकट दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू! 

◻️ अहिल्यानगर येथील औद्योगिक वसाहत बैठकीत पालकमंत्री विखे पाटलांची ग्वाही

संगमनेर LIVE (​अहिल्यानगर) | औद्योगिक क्षेत्रासमोर उभ्या ठाकलेल्या गॅस तुटवड्याच्या प्रश्नावर केंद्र आणि राज्य सरकार अत्यंत गंभीर असून, हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी आणि औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन गॅस वितरणातील सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय त्रुटी तात्काळ दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा कडक सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत. 

अहिल्यानगर आणि जिल्ह्यातील इतर औद्योगिक वसाहतींमधील गॅस टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर, मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. ​या बैठकीत उद्योजकांनी आपल्या विविध समस्या मांडल्या. विशेषतः पीएनजी (PNG) वाहिनीच्या जोडण्या प्रलंबित असल्याचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित करण्यात आला. 

यावर मार्केटिंग अधिकारी मनोज जाधव यांनी आतापर्यंत बाराशे ते तेराशे जोडण्या पूर्ण झाल्याची माहिती दिली. मात्र, सर्व उद्योजक जोडणी घेण्यास तयार असूनही गॅस कंपनीकडे असलेल्या अपुऱ्या यंत्रणेमुळे कामात अडथळे येत असल्याचे निदर्शनास येताच मंत्र्यांनी तातडीने मनुष्यबळ वाढवण्याचे आणि मराठा चेंबर किंवा एमआयडीसी कार्यालयात स्वतंत्र यंत्रणा सुरू करण्याचे आदेश दिले. 

तसेच, ज्या कंपन्यांचे करार पूर्ण झाले आहेत, त्यांना त्वरित गॅस पुरवठा सुरू करावा आणि महापालिकेने वाढवलेल्या दरामुळे थांबलेल्या घरगुती जोडण्यांबाबत महापौर व स्थायी समिती अध्यक्षांनी योग्य मार्ग काढावा, असेही त्यांनी सूचित केले. औद्योगिक कॅन्टीनला ५० टक्के गॅस पुरवठा आणि ५ किलोचे सिलेंडर उपलब्ध करून दिल्याने कामगारांना मोठा दिलासा मिळणार असून, वसाहतीमधील अतिक्रमणांवर पोलीस प्रशासनाच्या मदतीने कडक कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

​“जागतिक परिस्थितीमुळे आव्हाने निर्माण झाली असली, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे देश खंबीरपणे उभा आहे. उद्योजकांच्या राज्यस्तरीय प्रश्नांबाबत मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढेन. उद्योग सुरू राहण्यासाठी आणि कामगारांचे स्थलांतर रोखण्यासाठी प्रशासन उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील.” अशी ग्वाही पालकमंत्री विखे पाटील यांनी दिली.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !