दुर्गापूर येथे श्री क्षेत्र आनंद बाबा व काशाई देवीचा यात्रा उत्सव उद्यापासून!
◻️ भाविकांची मांदियाळी लक्षात घेता यात्रा कमिटीकडून तयारी पूर्ण
संगमनेर LIVE (लोणी) | राहाता तालुक्यातील दुर्गापूरचे ग्रामदैवत आणि लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र आनंद बाबा आणि काशाई देवीचा वार्षिक यात्रा उत्सव उद्या शनिवार, दि. २१ मार्चपासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून संपूर्ण परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे.
ग्रामदैवत श्री आनंद बाबा हे ग्रामस्थांचे श्रध्दास्थान असून मोठा अध्यात्मिक नावलौकिक असल्याने या यात्रेसाठी केवळ जिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
यात्रेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच उद्या शनिवारी पारंपरिक धार्मिक विधींना सुरुवात होईल. दुपारी वाजत-गाजत मानाच्या काठीची मिरवणूक काढण्यात येणार असून, रात्रीच्या वेळी मनोरंजनासाठी भव्य दारूकाम आणि शोभेची आतिषबाजी हे भाविकांसाठी मुख्य आकर्षणाचे केंद्र ठरेल. रात्री मनोरंजनाच्या कार्यक्रमांतर्गत सुप्रसिद्ध लोकनाट्य तमाशा आयोजित करण्यात आला आहे. यामुळे यात्रेची रंगत अधिकच वाढणार आहे.
उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी देखील विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. यामध्ये प्रामुख्याने नामवंत कलावंतांच्या हजऱ्यांचा कार्यक्रम पार पडेल. तसेच यात्रेचे विशेष आकर्षण असलेला कुस्त्यांचा भव्य हगामा रविवारी रंगणार असून, यात अनेक दिग्गज पैलवान आपले कसब आजमावणार आहेत. या निमित्ताने पंचक्रोशीतील कुस्तीप्रेमींची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान यात्रेच्या परंपरेनुसार यावर्षी भाविकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन यात्रा कमिटीने चोख नियोजन केले आहे. दुर्गापूरच्या या पावन उत्सवात सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.