धर्माच्या नावाखाली समाजाचे शोषण ही विकृतीचं - मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

संगमनेर Live
0
धर्माच्या नावाखाली समाजाचे शोषण ही विकृतीचं - मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

◻️ कॅप्टन अशोक खरात प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढण्याची दिली ग्वाही

​संगमनेर LIVE | धर्माच्या नावाखाली समाजाचे शोषण करणे अत्यंत क्लेशदायक असून, नाशिक येथील कॅप्टन अशोक खरात प्रकरणातील सर्व पाळेमुळे पोलीस तपासातून समोर येतील, असा विश्‍वास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. या प्रकरणातील विकृती समाजासमोर आणण्यासाठी सरकार कटिबध्द असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

​माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील पुढे म्हणाले की, कॅप्टन अशोक खरात याने कोणाची कशी फसवणूक केली आणि कोणाच्या मालमत्ता बळकावल्या, याचा सखोल तपास करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथकाची (SIT) नियुक्ती केली आहे. खरात याच्या मंदिराच्या ट्रस्टमध्ये जर कोणी दोषी आढळले, तर त्यांचीही सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, कारण या घटनेचा तीव्र संताप संपूर्ण राज्यात उमटत आहे. पोलिसांनी यापूर्वीच काही व्हिडिओ जप्त केले असून, त्यामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीची पोलीस प्रशासनाकडून कसून चौकशी केली जाईल, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

​यासोबतच, वडगावपान येथील दुर्दैवी घटनेचा संदर्भ देत मंत्री महोदयांनी सांगितले की, पोलीस या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत असून स्थानिक नागरिकांचीही चौकशी करण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर, गावातील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी सर्वच ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक आहे. 

तसेच, जिल्ह्यातील नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असून, जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. शासन स्तरावर प्रचलित नियमांनुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत जाहीर केली जाईल, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !