अफवांवर विश्‍वास न ठेवता लसीकरण करून घ्या - सौ. नीलम खताळ

संगमनेर Live
0
अफवांवर विश्‍वास न ठेवता लसीकरण करून घ्या - सौ. नीलम खताळ

◻️ ​तळेगाव दिघे प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘एचपीव्ही' लसीकरणाचा शुभारंभ


​संगमनेर LIVE | पोलिओपासून ते विविध आजारांवर मात करण्यासाठी लसीकरण अत्यंत आवश्यक असते. महिलांमधील कर्करोगाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी प्रभावी ठरणारी ‘एचपीव्ही' (HPV) लस यापूर्वी केवळ खाजगी स्तरावर आणि महागड्या दरात उपलब्ध होती. मात्र, महायुती सरकारने आता ही लस मुलींसाठी मोफत उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांना बळी न पडता सर्व मुलींनी एचपीव्हीचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन सौ. नीलम खताळ यांनी केले.

​संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मुलींसाठीच्या मोफत ‘एचपीव्ही' लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सौ. नीलम खताळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

यावेळी बोलताना सौ. खताळ म्हणाल्या की, “आजच्या मुलीच उद्याचे भविष्य आहेत. मुली आणि महिलांमध्ये कॅन्सरचे (कर्करोग) प्रमाण वाढत असल्याने त्यापासून त्यांना संरक्षण मिळावे, यासाठी एचपीव्ही लस अत्यंत महत्त्वाची आहे. काही जण अफवा पसरवून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. पालक व मुलींनी अशा कोणत्याही अफवांना बळी न पडता ही लस घेणे आवश्यक आहे.”

​तसेच, आशा सेविका आणि आरोग्य सेविकांनी प्रत्येक घराघरात जाऊन या लसीकरणाचे महत्त्व महिलांना पटवून द्यावे. मुलांसाठी आणि मुलींसाठी विविध आजारांपासून संरक्षण देणाऱ्या अनेक लसी उपलब्ध आहेत, सर्वानी या लसीकरणाचा लाभ घ्यावा. आशा सेविकांच्या काही अडीअडचणी असल्यास त्याही मला सांगाव्यात, आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून त्या सोडविण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ हा महत्त्वाचा शासकीय कार्यक्रम असतानाही, केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डामसे हे अनुपस्थित होते. उपस्थित नागरिक आणि कार्यकर्त्यांनी डॉ. डामसे यांच्या कार्यपद्धतीबाबत सौ. नीलम खताळ यांच्यासमोर तीव्र नाराजी व्यक्त केली. “डॉ. डामसे हे कधीच प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांच्या तपासणीसाठी थांबत नाहीत,” अशी तक्रार ग्रामस्थांनी केली. यावर गंभीर दखल घेत सौ. खताळ यांनी प्रभारी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना थेट निर्देश दिले की, या वैद्यकीय अधिकाऱ्याची तत्काळ बदली करावी आणि त्यांच्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांकडे रीतसर प्रस्ताव पाठवावा.

यावेळी प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निलेश माने यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. राज्य शासनाच्या वतीने मुलींसाठी ही अत्यंत मोलाची ‘एचपीव्ही' लस मोफत दिली जात आहे. या लसीबाबत समाजात काही गैरसमज आणि अफवा पसरवल्या जात आहेत. मुलींच्या आई-वडिलांनी यापैकी कुठल्याही अफवेवर विश्‍वास न ठेवता आपल्या मुलींचे सुरक्षितपणे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन डॉ. माने यांनी केले.

दरम्यान या कार्यक्रमासाठी प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निलेश माने, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, तळेगाव दिघेचे उपसरपंच मयूर दिघे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब दिघे, शिवाजी आहेर, नंदकुमार देशपांडे, राजेंद्र आहेर, उत्तम दिघे, अमोल दिघे, नवनाथ राऊत, कचरू वारूंक्षे, रवींद्र दिघे, सुवर्णा दिघे, निखिल सानप यांच्यासह परिसरातील आरोग्य सेविका, आशा सेविका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !