उच्चशिक्षित स्त्री हीच प्रगत आणि समृद्ध भारताची गुरुकिल्ली - डॉ. सुधा कांकरिया
◻️ सात्रळ महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन
संगमनेर LIVE (सात्रळ) | स्त्री भोवतालच्या समाजाकडे डोळसपणे पाहत असते. समाजातील प्रश्न समजून घेत ते सोडवण्यासाठी आजची उच्चशिक्षित स्त्री धैर्याने पुढे येत आहे. राष्ट्राची सर्वागीण प्रगती स्त्री आणि पुरुष या दोन चाकांवर अवलंबून असून, सकारात्मक सामाजिक परिवर्तनाची ती नांदी आहे. मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व अशा सर्वच आघाड्यांवर यशस्वी ठरलेली ‘उच्चशिक्षित स्त्री हीच प्रगत व समृद्ध भारताची गुरुकिल्ली आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुधा कांकरिया यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सात्रळ (ता. राहुरी) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने ‘उच्च शिक्षणातील महिलांचा सहभाग’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. कांकरिया बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक ॲड. आप्पासाहेब दिघे होते. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त पुणे जिल्हा ग्राहक मंच न्यायाधीश ॲड. मधुगिता सुखातमे, प्रवरा शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, एआय काउन्सलर पवन वर्मा, महाविद्यालय विकास समितीच्या सदस्या सौ. मंदाताई डुक्रे आणि गायत्री म्हस्के उपस्थित होत्या.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. सुस्मिता विखे पाटील म्हणाल्या, “समाजाच्या प्रगतीसाठी उच्च शिक्षणातील महिलांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विज्ञान आणि कला अशा सर्वच क्षेत्रांत महिलांनी लक्षणीय यश मिळवले आहे. स्त्री-पुरुष समानता ही केवळ वैचारिक नव्हे, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्तरावरही मिळायला हवी. एक समर्थ देश घडवायचा असेल, तर या वैश्विक संसाररथाची स्त्री आणि पुरुष ही दोन्ही चाके भक्कम असली पाहिजेत.” असे मत व्यक्त केले.
न्यायाधीश ॲड. मधुगिता सुखातमे यांनी उपस्थितांना अंतर्मुख करणारे विचार मांडले. त्या म्हणाल्या, “प्राचीन सावित्री ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हा ज्ञानयज्ञाचा प्रवास आपण समजून घेतला पाहिजे. प्राचीन काळात स्त्री-पुरुष असा भेदभाव नव्हता; मग आज न्यायालयात दररोज येणारे घटस्फोटांचे ढिगभर अर्ज हे कशाचे प्रतीक आहेत? केवळ ‘कागदी शिक्षणाने’ आपल्याला काय दिले, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. खरे संस्कार आणि अनौपचारिक शिक्षण हे घरापासूनच सुरू होते. महिलांनी संविधानाने दिलेल्या हक्क आणि सोयींचा योग्य वापर करून घ्यायला हवा.” यावेळी त्यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थिनींशी थेट संवाद साधला.
अध्यक्षीय मनोगतात ॲड. आप्पासाहेब दिघे यांनी प्रवरा शिक्षण संस्थेच्या योगदानावर प्रकाश टाकला. “शिक्षित महिला समाजात सकारात्मक बदल घडवून भावी पिढीला अधिक सक्षम बनवतात. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी ग्रामीण भागातील शेतकरी, गरीब आणि होतकरू मुला-मुलींसाठी उभ्या केलेल्या या शैक्षणिक वटवृक्षाचे कार्य आज नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या खंबीर नेतृत्वाखाली नव्या आव्हानांना पेलत गतिमान झाले आहे,” असे ते म्हणाले.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सोपान शिंगोटे यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रीय चर्चासत्राच्या समन्वयक व उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी डॉ. सुधा कांकरिया यांनी उपस्थित सर्वाकडून ‘महिला सन्मान’ व्यक्त करणारी सामूहिक प्रतिज्ञा म्हणून घेतली.
दरम्यान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीप्ती आगरकर व डॉ. अनंत केदार यांनी केले, तर आभार डॉ. राम तांबे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. रामदास बोरसे, प्रा. दिनकर घाणे, डॉ. सोमनाथ बोरुडे, डॉ. भाऊसाहेब नवले, राजनाथ गोडगे यांच्यासह विद्यार्थी - विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले. अशी माहिती पत्रकार समर्थ वाकचौरे यांनी कळवली आहे.