पाणी, मराठी भाषा भवन आणि तीर्थक्षेत्र विकासासाठी आमदार अमोल खताळ आक्रमक
◻️ विधानसभेत मतदार संघातील पायाभूत सुविधांची जोरदार मागणी
संगमनेर LIVE (मुंबई) | मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांनी आपल्या मतदारसंघातील प्रलंबित आणि जिव्हाळ्याचे प्रश्न अतिशय प्रभावीपणे मांडून शासनाचे लक्ष वेधले. मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न, मराठी भाषेचे संवर्धन आणि धार्मिक स्थळांचा विकास अशा त्रिसूत्रीवर आधारित मागण्यांनी सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.
संगमनेर मतदारसंघातील अनेक गावे आजही निळवंडे धरण आणि भोजापूर पूरचारी योजनेच्या लाभापासून वंचित असल्याची बाब आमदार खताळ यांनी सभागृहात अधोरेखित केली. विशेषतः सायखिंडी आणि चिकणी या परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी व सिंचनासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या भागातील पाणीटंचाईचे गंभीर स्वरूप पाहता, वंचित गावांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने ‘उपसा सिंचन योजना’ राबवावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. ही योजना कार्यान्वित झाल्यास या भागातील शेतीला नवसंजीवनी मिळेल आणि नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पाण्याच्या प्रश्नासोबतच संगमनेरच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकण्यासाठी शहरात ‘मराठी भाषा भवन’ उभारण्याची मागणीही आमदार खताळ यांनी लावून धरली. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे हे संगमनेरचेच सुपुत्र असल्याचा अभिमान त्यांनी यावेळी व्यक्त केला. संगमनेर ही साहित्य आणि सांस्कृतिक चळवळींची भूमी असल्याने येथे मराठी भाषा भवन उभारल्यास साहित्य संमेलन, व्याख्याने आणि संशोधनासारख्या उपक्रमांना हक्काचे व्यासपीठ मिळेल, ज्यामुळे तरुण पिढीमध्ये मराठी भाषेबद्दल अभिमान जागृत होईल, असे त्यांनी नमूद केले.
मतदारसंघातील धार्मिक स्थळांच्या विकासाबाबत बोलताना त्यांनी हिवरगाव पावसा येथील श्री खंडोबा महाराज (देवगड) देवस्थानचा मुद्दा उपस्थित केला. या देवस्थानला शासनाने ‘ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला असून येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या पार्श्वभूमीवर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेच्या माध्यमातून मंदिर परिसराचा विकास, रस्ते, पिण्याचे पाणी आणि स्वच्छता गृहे यांसारख्या मूलभूत सोयी-सुविधांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. ग्रामीण भागातील अशा तीर्थक्षेत्रांचा विकास झाल्यास धार्मिक पर्यटनाला चालना मिळून स्थानिक रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.
एकूणच, मतदारसंघातील रस्ते, पाणी, शिक्षण आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आमदार अमोल खताळ सातत्याने पाठपुरावा करत असून, अर्थसंकल्पीय अधिवेशनातील त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे संगमनेरच्या प्रलंबित प्रश्नांना आता मोठी गती मिळण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
“संगमनेरमधील प्रत्येक नागरिकाला पाणी मिळणे आणि आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन होणे हे माझे कर्तव्य आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडलेल्या या प्रश्नांवर शासन सकारात्मक निर्णय घेईल, असा मला विश्वास आहे.” असे आमदार अमोल खताळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.