७२ वर्षाच्या आजीची संगमनेरच्या मैदानात फटकेबाजी!
◻️डॉ. जयश्री थोरात यांच्या ‘एकविरा महोत्सवात’ आजींने दिला आरोग्याचा मंत्र!
संगमनेर LIVE | आनंदी जीवन जगण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसते, हे राजापूरच्या ७२ वर्षीय अंजनाबाई शिंदे यांनी आपल्या उत्साहाने सिद्ध करून दाखवले आहे. डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘एकविरा क्रीडा महोत्सवात’ या आजींनी केवळ सहभागच नोंदवला नाही, तर क्रिकेटच्या मैदानात फलंदाजी आणि गोलंदाजीची चुणूक दाखवत उपस्थित सर्व महिला व युवतींना तणावमुक्त जीवन आणि उत्तम आरोग्याचा मोलाचा मंत्र दिला.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या या क्रीडा महोत्सवात चौथ्या दिवशी ‘सहेली ग्रुप राजापूर’ संघाचे नेतृत्व ७२ वर्षीय अंजनाबाई शिंदे यांनी केले. डोक्यावर एकविरा फाउंडेशनची कॅप परिधान करून जेव्हा आजी टॉस उडवण्यासाठी मैदानात आल्या, तेव्हा संपूर्ण स्टेडियममध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यानंतर त्यांनी दोन दमदार चौकारांसह १२ धावा फटकावल्या आणि केवळ फलंदाजीवर न थांबता गोलंदाजीमध्येही कमाल करत दोन महत्त्वपूर्ण बळी घेतले. विशेष म्हणजे, वयाच्या ७२ व्या वर्षीही त्यांनी पूर्णवेळ मैदानावर राहून चपळाईने क्षेत्ररक्षण केले, ज्यामुळे त्यांच्या संघाने सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला.
सामन्यानंतर बोलताना अंजनाबाई शिंदे यांनी महिलांना आरोग्याचा सल्ला दिला. त्या म्हणाल्या की, आनंदी राहण्यासाठी चांगला आहार, नियमित व्यायाम आणि शांत झोप अत्यंत आवश्यक आहे. महिलांनी सातत्याने उपक्रमशील राहिल्यास आजार आपोआप दूर पळून जातात.
त्यांनी डॉ. जयश्री थोरात यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, डॉ. जयश्री वडिलांप्रमाणेच नम्र स्वभावाच्या असून त्यांनी ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी हा जो उपक्रम हाती घेतला आहे, तो अतिशय स्तुत्य आहे. केवळ काम करत न राहता मन शांत ठेवा आणि भाजी-भाकरी खाऊन निवांत झोपा, असा साधा पण प्रभावी मंत्र त्यांनी दिला.
या प्रसंगी डॉ. जयश्री थोरात यांनी माहिती दिली की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या क्रीडा महोत्सवाचे हे चौथे वर्ष असून यंदा सुमारे ५ हजार ५०० महिलांनी यात उदंड प्रतिसाद दिला आहे. या स्पर्धेमध्ये १६० क्रिकेट संघ, २५२ रश्शीखेच आणि ३२७ बॅडमिंटन संघांचा समावेश असून, खेळाच्या जोडीलाच होणाऱ्या झुंबा डान्समध्येही महिला मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. या उपक्रमामुळे केवळ आरोग्यच सुधारत नाही, तर तालुक्यातील हजारो महिलांना एकत्र येण्याचे आणि नवीन मैत्रिणी जोडण्याचे एक हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे.
दरम्यान संगमनेरचा हा क्रीडा महोत्सव केवळ खेळाची स्पर्धा न राहता महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि आनंदाचा एक मोठा सोहळा बनला असून, ७२ वर्षीय आजींचा उत्साह सर्वासाठी प्रेरणादायी ठरत आहे.