महिलांनी नवीन तंत्रज्ञान अवगत करून स्वतःला सिद्ध करावे - सौ. शालिनीताई विखे
◻️ पायरेन्स येथे महिला दिनानिमित्त ‘सन्मान स्त्री शक्तीचा’ कार्यक्रम संपन्न
संगमनेर LIVE (लोणी) | जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून केवळ एका दिवसाचा सन्मान करण्यापेक्षा, स्त्रीचा दररोज आणि कायमस्वरूपी सन्मान होण्याची खरी गरज आहे. आज महिला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहेत, मात्र त्यांचे कर्तृत्व अधिक फुलवण्यासाठी घरच्यांनीही त्यांना समजून घेऊन संसाराच्या गाड्यात हातभार लावणे आवश्यक असून महिलांनी नवीन तंत्रज्ञान कौशल्य अवगत करून स्वतःला सिद्ध करावे. असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अॅड एज्युकेशन इन नॅचरल अॅड सोशल सायन्सेस (पायरेन्स), लोणी येथे आयोजित ‘सन्मान स्त्री शक्तीचा’ या कार्यक्रमात सौ. विखे या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे पाटील यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. निलेश वनकर, संचालक मोहसिन तांबोळी, डॉ. कल्पना साठे, प्रा. ऋतुजा कोतकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना सौ. विखे पाटील म्हणाल्या की, जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य सातत्याने सुरू असून बचत गटांच्या माध्यमातून त्यांना विविध कौशल्ये देऊन स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. समाजात एकल महिलांविषयी जो संकुचित दृष्टिकोन आहे, तो बदलणे काळाची गरज असून त्यांनाही सन्मानाची वागणूक देऊन समाजाचा मुख्य घटक मानले पाहिजे. महिलांनी प्रगतीच्या संधींचे सोने करत असताना एकमेकींचे पाय खेचण्यापेक्षा एकमेकींच्या कर्तृत्वाचा आदर करावा आणि त्यातून आदर्श घेऊन पुढे जावे. कर्तृत्वाच्या या प्रवासात स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्याचा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
प्रास्ताविक करताना डॉ. निलेश वनकर म्हणाले की, प्रवरेच्या जडणघडणीत सौ. शालिनीताई विखे पाटील यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांचा आदर्श घेऊन अनेक महिला आज गावगाडा आणि संस्थांचा कारभार समर्थपणे सांभाळत आहेत. महिलांना योग्य व्यासपीठ व प्रोत्साहन देणे हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
यानिमित्ताने महिलांसाठी विविध 'फनी गेम्स' आणि खेळांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. गायत्री म्हस्के यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. रनिता वलवे यांनी मानले.