शेतकऱ्यांचे पैसे अडवणाऱ्या बॅकांवर कारवाई करा - आमदार अमोल खताळ

संगमनेर Live
0
शेतकऱ्यांचे पैसे अडवणाऱ्या बॅकांवर कारवाई करा - आमदार अमोल खताळ

◻️ संगमनेरच्या कांदा उत्पादकांच्या प्रश्नावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला धरले धारेवर


​संगमनेर LIVE (मुंबई) | मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथांनी पुन्हा एकदा सभागृहाचे लक्ष वेधून घेतले आहे. आमदार अमोल खताळ यांनी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न अत्यंत आक्रमकपणे मांडत सरकारला धारेवर धरले. अवकाळी पावसाचा फटका, कोसळलेले दर आणि बँकांकडून होणारी अडवणूक या त्रिसूत्री संकटात सापडलेल्या बळीराजाला न्याय देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

​सभागृहात आपली बाजू मांडताना आमदार खताळ यांनी सांगितले की, संगमनेर तालुक्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते, मात्र यंदा अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिकांचे रीतसर पंचनामे होऊनही शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई अद्याप प्रलंबित असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच बियाणे, खते, औषधे आणि मजुरी यामुळे कांदा उत्पादनाचा खर्च गगनाला भिडला असताना, बाजारपेठेत मिळणारा भाव हा उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याने शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत आहे. शेतकऱ्यांसाठी सर्वात चिंतेची बाब म्हणजे, शासनाकडून जाहीर झालेल्या कर्जमाफीचा आणि अनुदानाचा लाभ मिळताना बॅकांकडून जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात आहेत. काही बॅका चक्क शेतकऱ्यांच्या खात्यांवर ‘होल्ड’ लावून त्यांचे हक्काचे पैसे अडवत आहेत, हा थेट शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे खताळ यांनी नमूद केले.

​या गंभीर परिस्थितीचा विचार करून आमदार खताळ यांनी सरकारकडे प्रलंबित नुकसान भरपाईचा निधी तातडीने वितरित करण्याची आग्रही मागणी केली. तसेच, ज्या बॅका अनुदान किंवा कर्जमाफीचे पैसे रोखून धरत आहेत, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. वाढत्या उत्पादन खर्चाचा विचार करून कांदा उत्पादकांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करणे आता काळाची गरज असल्याचेही त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले.

​“शेतकऱ्याचा हक्काचा पैसा अडवण्याचा अधिकार कोणालाही नाही. संगमनेरचा शेतकरी आज संकटात आहे आणि त्याला न्याय मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही.” असे आमदार अमोल खताळ सभागृहात म्हणाले आहेत.

​दरम्यान संगमनेर तालुक्यातील हा प्रश्न आता केवळ स्थानिक राहिला नसून, संपूर्ण राज्यातील कांदा उत्पादक पट्ट्यात याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आमदार खताळ यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर आता सरकार यावर काय ठोस निर्णय घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !