​प्रा. दीपक पवार यांना ‘अर्बन नक्षल’ ठरवणे हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार

संगमनेर Live
0
​प्रा. दीपक पवार यांना ‘अर्बन नक्षल’ ठरवणे हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार

 ◻️ कॉम्रेड डॉ. अजित नवले यांची राज्य सरकारवर घणाघाती टिका 


​संगमनेर LIVE | महाराष्ट्रातील मराठी भाषेला केवळ अस्मितेचा मुद्दा न ठेवता, ती सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी आणि कामगारांच्या रोजगाराची व जगण्याची भाषा व्हावी यासाठी लढा देणारे लोकभाषेचे नेते प्रा. दीपक पवार यांच्यावर ‘अर्बन नक्षल' असल्याचा शिक्का मारणे, हा राज्य सरकारचा लोकशाही हक्क चिरडण्याचा डाव आहे, अशा शब्दांत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) सरकारचा तीव्र निषेध केला आहे.

​प्रा. दीपक पवार हे केवळ मराठी भाषेचे अभ्यासक नसून, ते लोकभाषेच्या चळवळीचे महत्त्वाचे प्रवक्ते आणि संघटक आहेत. मराठीला राजभाषा, व्यवहारभाषा आणि अर्थकारणाची भाषा बनवण्यासाठी त्यांनी राज्यभर मोठी जनजागृती केली आहे. “मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे नाटक करून तिला इतिहासाच्या देव्हाऱ्यात बंद करण्याचे काम सध्या सुरू आहे,” अशी टीका माकपच्या राज्य समितीने केली आहे.

​कॉम्रेड डॉ. अजित नवले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, “जेव्हा एखादा विचारवंत सरकारच्या जनविरोधी अर्थनीतीवर आणि मराठी भाषकांच्या रोजगाराच्या प्रश्नावर भाष्य करतो, तेव्हा त्यांना ‘अर्बन नक्षल' ठरवून गप्प करण्याचा प्रयत्न केला जातो. हे भारतीय जनता पक्ष आणि विद्यमान सरकारचे लोकशाहीविरोधी कारस्थान आहे. राज्य सरकारने आणलेले ‘जन सुरक्षा विधेयक’ हे केवळ विरोधकांचा आवाज दडपण्यासाठीच वापरले जात आहे, हे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.” असा घणाघात केला.

दरम्यान ​मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जाहीर केले आहे की, पक्ष पूर्ण शक्तीनिशी प्रा. दीपक पवार यांच्या पाठीशी उभा राहील. मराठी भाषेसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर बेताल आरोप करून त्यांचा आवाज बंद करण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना ‘माकप’ सक्रिय विरोध करेल. अशी ग्वाही डॉ. अजित नवले यांनी दिली आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !