अ‍ॅड. संजय सावंत यांची म्हाडाच्या पॅनलवर कायदेशीर सल्लागार म्हणून निवड

संगमनेर Live
0
अ‍ॅड. संजय सावंत यांची म्हाडाच्या पॅनलवर कायदेशीर सल्लागार म्हणून निवड

◻️​ पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचा महत्वपूर्ण निर्णय

संगमनेर LIVE (पुणे) | पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा) कडून वकील पॅनलची निवड प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली असून, यामध्ये प्रख्यात कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. संजय दत्तात्रय सावंत यांची कायदेशीर सल्लागार पदी निवड करण्यात आली आहे. म्हाडाच्या पुणे विधी विभागातील गुंतागुंतीचे कायदेशीर दावे आणि सल्लागार म्हणून त्यांचे योगदान विभागासाठी मोलाचे ठरणार आहे.

​पुणे म्हाडाअंतर्गत जिल्हा व सत्र न्यायालय, ग्राहक न्यायालय, सहकार न्यायालय, महसूल न्यायालय आणि विविध प्रशासकीय न्यायाधिकरणांमधील दावे प्रभावीपणे चालवण्यासाठी अनुभवी वकिलांची आवश्यकता होती. या पार्श्‍वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट २०२५ दरम्यान जाहिरातीद्वारे इच्छुक वकिलांकडून अर्ज मागवण्यात आले होते. या प्रक्रियेत राज्यातील अनेक अनुभवी वकिलांनी सहभाग नोंदवला होता. प्राप्त अर्जाची छाननी करून नोव्हेंबर २०२५ मध्ये मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आणि त्यामध्ये अ‍ॅड. संजय सावंत यांच्या प्रदीर्घ अनुभवाची व कौशल्याची दखल घेत म्हाडा प्रशासनाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

अ‍ॅड. संजय सावंत पाटील यांना कायदेशीर क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून, त्यांनी शासकीय, निमशासकीय आणि सामाजिक अशा विविध स्तरांवर आपली ओळख निर्माण केली आहे. सध्या ते महावितरण, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच जगदंब आणि येसूबाई सामाजिक प्रतिष्ठान यांसारख्या नामवंत संस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या याच अष्टपैलू अनुभवाचा विचार करून म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची पुणे विभागाच्या विधी विभागात नियुक्ती केली आहे.

​या निवडीचे अधिकृत पत्र पुणे विभागाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आले असून, पुणे विभागाचे विधी सल्लागार अधिकारी डॉ. तुषार जाधव यांच्या हस्ते ते अ‍ॅड. सावंत यांना प्रदान करण्यात आले. यावेळी म्हाडा कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. म्हाडाच्या पॅनलवर नियुक्ती झाल्याबद्दल अँड. संजय सावंत यांनी आनंद व्यक्त केला असून, म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, मुख्य अधिकारी राहुल साकोरे, डॉ. तुषार जाधव आणि संपूर्ण कर्मचारी वर्गाचे त्यांनी जाहीर आभार मानले आहेत.

दरम्यान अ‍ॅड. संजय सावंत यांच्या नियुक्तीमुळे म्हाडाच्या न्यायालयीन प्रक्रियेला अधिक गती आणि कायदेशीर बळकटी मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !