सात्रळ शिवारात दुसरा बिबट्याचा बछडा जेरबंद!

संगमनेर Live
0
सात्रळ शिवारात दुसरा बिबट्याचा बछडा जेरबंद!

◻️ भय इथले अद्याप न संपल्याने पिंजरा पुन्हा तैनात

संगमनेर LIVE (​सात्रळ) | ​राहुरी तालुक्यातील सात्रळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बिबट्याच्या दहशतीला लगाम लावण्यात वनविभागाला काही अंशी यश आले आहे. सात्रळ - तांभेरे रस्त्यावरील दावीद फकिरा पलघडमल यांच्या शेतात शनिवारी मध्यरात्री एक वर्षाची मादी बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. गेल्या दोन दिवसांतील ही दुसरी यशस्वी कारवाई असल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.

पत्रकार समर्थ वाकचौरे यांनी कळवलेल्या माहितीनुसार, ​गेल्या महिन्याभरापासून पलघडमल आणि साबळे वस्तीवर बिबट्यांच्या कुटुंबाचा वावर वाढला होता. यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. दोन दिवसांपूर्वीच याच परिसरात बिबट्याचा एक बछडा जेरबंद झाला होता. मात्र, परिसरात आणखी बिबट्यांचे अस्तित्व असल्याचे लक्षात घेऊन वनविभागाने १ एप्रिल रोजी दावीद पलघडमल यांच्या गट नंबर २९०/२ मध्ये पुन्हा पिंजरा लावला होता.

​शनिवारी (दि. ४ एप्रिल) पहाटे ५ वाजेच्या सुमारास पिंजऱ्यात ठेवलेल्या सावजाला (कोंबड्या) पकडण्याच्या नादात एक वर्ष वयाचे मादी पिल्लू अलगत पिंजऱ्यात अडकले. बिबट्या जेरबंद झाल्याचे समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे, सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पिंजऱ्याच्या आजूबाजूला आणखी दोन बिबटे फिरताना दिसून आले, ज्यामुळे परिसरात अजूनही धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, काही दिवसांपूर्वी पत्रकार अनिल वाकचौरे देखील दुचाकीवरून जाताना बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले होते.

​प्रविण पलघडमल यांनी तातडीने वनविभाग राहुरी व प्राणीमित्र विकास म्हस्के यांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वनपाल एस. आर. कोरके, वनरक्षक घुगे, बी. आर. दिवे, एस. आर. झंझट आणि चालक तारु यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अहिल्यानगर जिल्ह्याचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहाय्यक उपवनसंरक्षक गणेश मिसाळ आणि राहुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही करण्यात आली.

​या मोहिमेदरम्यान प्रविण पलघडमल, सचिन पलघडमल, प्रभाकर पलघडमल, राजु साबळे, आरुष पडघडमल, मयूर पडघडमल, सतीश बर्डे, सोमनाथ बर्डे आणि विशाल गोधाडे यांनी वनविभागाला मदत केली. जेरबंद बिबट्याला सुरक्षित ठिकाणी हलवून वनविभागाने पुन्हा त्याच जागेवर पिंजरा लावला आहे. वनविभागाच्या या कार्यतत्परतेबद्दल सात्रळ परिसरातील नागरिकांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत. अशी माहिती पत्रकार समर्थ वाकचौरे यांनी कळवली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !