संगमनेर येथून देशातील एकाधिकारशाही रोखण्याचे रणशिंग काॅग्रेस फुंकले!

संगमनेर Live
0
संगमनेर येथून देशातील एकाधिकारशाही रोखण्याचे रणशिंग काॅग्रेस फुंकले!

◻️ ‘संघटन सृजन अभियाना’ला राजेश ठाकूर, सरत राऊत, डॉ. शिवाजीराव काळगे उपस्थित

​संगमनेर LIVE | देशात सध्या जातीपातीचे आणि भेदभावाचे राजकारण सुरू असून ते लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. या विचारधारेविरुद्ध राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काॅग्रेस सक्षमपणे लढत असून, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्ह्यात काॅग्रेस आगामी काळात अधिक मजबूत होईल, असे प्रतिपादन झारखंड काॅग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर यांनी केले. 

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित ‘संघटन सृजन अभियान’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ओडिसाचे माजी मंत्री सरत राऊत, लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेसचे महासचिव श्रीकृष्ण सांगळे आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

​यावेळी बोलताना राजेश ठाकूर यांनी कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना सांगितले की, काॅग्रेस पक्षात युवकांसाठी मोठी संधी असून त्यांनी आता अधिक सक्रिय होण्याची गरज आहे. देशातील सध्याची एकाधिकारशाही रोखण्यासाठी कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामाला लागावे. केवळ पदांच्या मागे न लागता सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी रस्त्यावर उतरणे हीच काळाची गरज आहे. खासदार राहुल गांधींच्या पदयात्रेने कार्यकर्त्यामध्ये नवीन ऊर्जा भरली असून, ‘संघटन सृजन अभियान’ हे सर्व जाती-धर्म आणि महिला-युवकांना सोबत घेऊन जाणारे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.

​ओडिसाचे माजी मंत्री सरत राऊत यांनी संगमनेरमधील सहकार आणि शैक्षणिक मॉडेलचे कौतुक करताना सांगितले की, बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यात केलेले कार्य देशाला दिशा देणारे आहे. हा काॅग्रेसचा बालेकिल्ला असून इथली ताकद पुन्हा एकदा संपूर्ण राज्याला दाखवून देण्याची वेळ आली आहे.

लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनीही बाळासाहेब थोरात यांच्या पालकमंत्री काळातील आठवणींना उजाळा दिला. लातूरकर थोरात साहेबांनी केलेले काम कधीही विसरणार नाहीत, असे सांगत त्यांनी या अभियानाच्या माध्यमातून कार्यकर्त्याना संघटित होण्याचे आवाहन केले.

​कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. जयश्री थोरात यांनी प्रास्ताविक केले, तर जिल्हाध्यक्ष सचिन गुजर आणि सौ. दुर्गाताई तांबे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिन चौगुले यांनी केले. या कार्यक्रमाला तालुक्यातील आणि जिल्ह्यातील काॅग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !