अजित पवारांच्या विमान अपघाताची ‘सीबीआय’ चौकशी करा - नामदार आठवले
◻️ बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे केले आवाहन
संगमनेर LIVE (पुणे) | केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. बारामती पोटनिवडणूक, अजित पवारांचा अपघात आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी बोलताना नामदार रामदास आठवले यांनी बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची महत्त्वाची मागणी केली. अजित पवार यांचे राज्यातील मोठे योगदान लक्षात घेऊन काॅग्रेसने या जागेवर उमेदवार देऊ नये आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन त्यांनी केले. बारामतीमधून सुनेत्रा पवार निवडणूक अर्ज दाखल करणार असून, त्यांच्या प्रचारासाठी आपण स्वतः बारामतीला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत बोलताना आठवले यांनी संशय व्यक्त केला असून, या प्रकरणाची सीबीआय मार्फत सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवून चौकशीची विनंती केल्याची माहितीही त्यांनी दिली.
यासोबतच, आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सर्व जातींना आरक्षणाचा लाभ मिळावा आणि ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे, अशी आग्रही भूमिका मांडली. महिलांसाठी लोकसभेत २७३ जागा वाढवण्यासाठी लवकरच संसदेत विशेष विधेयक येणार असून, यामुळे महिलांना राजकारणात मोठी संधी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपल्या राज्यसभा खासदारकीच्या तिसऱ्या कार्यकाळाबद्दल बोलताना आठवले म्हणाले की, या पदाचा उपयोग ते देशभर पक्ष वाढवण्यासाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार रुजवण्यासाठी करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेल्या पाठबळाबद्दल त्यांनी आभार मानले.
तसेच, पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर टीका करताना, यंदा तिथे भाजप सत्तेत येईल आणि आपण स्वतः तिथे प्रचारात सक्रिय राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तामिळनाडू, आसाम आणि केरळमध्येही पक्ष स्वबळावर निवडणुका लढवून आपली मान्यता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यातील महायुतीबद्दल बोलताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिकन पक्षाला एक विधान परिषद आमदारकी आणि दोन महामंडळ पदे देण्याचे आश्वासन दिले असून, हा वाटा पक्षाला लवकरच मिळावा अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, पुणे महानगरपालिकेत भाजपने रिपब्लिकन पक्षाला उपमहापौर पद दिले असले, तरी महत्त्वाच्या बैठकांना पक्षाच्या प्रतिनिधींना बोलावले जावे, जेणेकरून दोन पक्षांत कोणताही गैरसमज किंवा वाद राहणार नाही, असेही नामदार आठवले यांनी स्पष्ट केले.