लोणी खुर्दमध्ये महामानव डॉ. आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीची जय्यत तयारी

संगमनेर Live
0
लोणी खुर्दमध्ये महामानव डॉ. आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीची जय्यत तयारी

◻️ समता तरुण मंडळाकडून व्याख्यान तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन 

संगमनेर LIVE (​सात्रळ) | राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील समता तरुण मंडळाच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती महोत्सवाचे अत्यंत भव्य आणि उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले आहे. 

सामाजिक बांधिलकी जपणारे एक आदर्श मंडळ म्हणून पंचक्रोशीत ओळख असलेले समता तरुण मंडळ केवळ उत्सवांपुरते मर्यादित न राहता रक्तदान शिबिरे, गरजू विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप आणि सामाजिक जनजागृती यांसारखे विविध लोकोपयोगी उपक्रम राबवत असतात. 

याच सामाजिक वारशाचा भाग म्हणून यावर्षीचा जयंती महोत्सव देखील अत्यंत आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा केला जाणार आहे. या जयंती महोत्सवानिमित्त सलग तीन दिवस विविध प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी ग्रामस्थांना मिळणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात रविवारी दि. १२ एप्रिल रोजी होणार असून, यावेळी युवा व्याख्याते जितेंद्र ओसोले यांचे वैचारिक प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर सोमवार दि. १३ एप्रिल रोजी विलास शिरसाठ यांचा बहारदार ‘भीम गीतांचा’ कार्यक्रम संपन्न होईल, ज्यातून भीमरायांच्या कर्तृत्वाचा गौरव गायला जाईल. महोत्सवाच्या मुख्य दिवशी म्हणजेच मंगळवार दि. १४ एप्रिल रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.

​१४ एप्रिल रोजी सकाळी प्रभात फेरीने या दिवसाची मंगलमय सुरुवात होईल, त्यानंतर मान्यवरांची समयोचित भाषणे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील. सायंकाळी पारंपरिक वाद्यांच्या आणि ढोल-ताशांच्या कडकडाटात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. या मिरवणुकीत फटाक्यांची नयनरम्य आतिषबाजी आणि फुलांची उधळण हे विशेष आकर्षण असणार आहे. कार्यक्रमाच्या सांगतेनंतर उपस्थित सर्व भीम अनुयायी आणि ग्रामस्थांसाठी आयोजकांच्या वतीने गोडधोड जेवणाचा खास बेत आखण्यात आला आहे.

दरम्यान, ​लोणी खुर्द येथील समता नगर आणि वेताळबाबा चौक परिसरात होणाऱ्या या सोहळ्यासाठी आणि सर्व कार्यक्रमांसाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समता तरुण मंडळातील सर्व सदस्यांनी केले आहे. अशी माहिती पत्रकार समर्थ वाकचौरे यांनी कळवली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !