कोल्हार-घोटी रस्त्यावरील १५ मैल फाटा ‘अपघातप्रवण क्षेत्र’ घोषित करा
◻️ सामाजिक कार्यकर्ते केतन लव्हाटे यांची उपाययोजना करण्याची मागणी
संगमनेर LIVE | कोल्हार - घोटी राज्य महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील चिंचपूर शिवारातील १५ मैल फाटा आणि लव्हाटे वस्ती परिसर सध्या अपघातांचे केंद्र बनला आहे. या ठिकाणी वाहनांचा अतिवेग आणि अपुऱ्या सुरक्षा साधनांमुळे नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे.
त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते केतन अरुण लव्हाटे यांनी प्रशासकीय यंत्रणेला ईमेलद्वारे निवेदन पाठवून हा परिसर ‘अपघात प्रवण क्षेत्र’ म्हणून घोषित करण्याची आणि तातडीने रस्ता सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
केतन लव्हाटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवले आहे. या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, १५ मैल फाटा हा अत्यंत गजबजलेला परिसर आहे. येथून शाळेच्या बसेस, महाविद्यालयाचे विद्यार्थी, लोणी येथे शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी तसेच आश्वी, उंबरी बाळापूर, निमगाव जाळी, औरंगपूर यासह पंचक्रोशीतील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असतात. मात्र, रस्ता ओलांडताना वाहनचालकांचा होणारा गोंधळ आणि वाहनांचा अनियंत्रित वेग यामुळे येथे सातत्याने लहान-मोठे अपघात होत आहेत.
त्यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्याच्या सुरक्षेचा विचार करून प्रशासनाने तातडीने या परिसराचे ‘रोड सेफ्टी ऑडिट’ करून याला अधिकृतपणे ‘ब्लॅक स्पॉट’ घोषित करावे, जेणेकरून गती मर्यादा दर्शवणारे बोर्ड लावणे सुलभ होईल. तसेच संपूर्ण परिसरात हाय-मास्ट दिवे किंवा सोलर लाईट्स बसवून प्रकाश व्यवस्था करावी आणि रोड मार्किगसह ‘कॅट आयज’ची सोय करावी. फाटा सुधारणा करताना गरजेनुसार क्रॅश बॅरियर आणि रंबल स्ट्रिप्स (गतिरोधक) बसवून भविष्यातील संभाव्य अपघात टाळण्यावर भर देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी पाठवलेल्या निवेदनात केली आहे.