तळेगाव प्रादेशिक योजनेतून शुध्द पाणीपुरवठा लवकरचं सुरू होणार!

संगमनेर Live
0
तळेगाव प्रादेशिक योजनेतून शुध्द पाणीपुरवठा लवकरचं सुरू होणार!

◻️ निंबाळे - वडगावपान पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात; ​कोल्हेवाडी फाट्याचा अडथळा दूर

​संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील निंबाळे शिवारात प्रवरा नदीवरून कोल्हेवाडी फाटा मार्गे वडगावपान साठवण तलावात पाणी सोडण्यासाठी सुरू असलेल्या पाईपलाईन जोडणीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हेवाडी फाटा येथे असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे हे काम काहीसे रखडले होते, मात्र आता सर्व अडथळे यशस्वीपणे दूर करण्यात आल्याने युध्दपातळीवर काम पुन्हा सुरू झाले आहे. या प्रगतीमुळे तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येणाऱ्या १६ गावांना येत्या १० ते १५ दिवसांत शुध्द पेयजल उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे.

​या योजनेच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला असता, प्रवरा नदीतून थेट पाईपलाईनद्वारे वडगावपान साठवण तलावात पाणी सोडण्याचे नियोजन आहे. ‘जलजीवन मिशन’च्या माध्यमातून येथे एक अद्ययावत जलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्यात आला असून, याद्वारे तळेगावसह परिसरातील १६ गावांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. प्रकल्पातील बहुतांश स्थापत्य कामे आधीच पूर्ण झाली असून, सध्या केवळ उर्वरित पाइपलाइन जोडणीचे तांत्रिक काम शिल्लक आहे, जे अंतिम टप्प्यात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

​दरम्यान, या महत्त्वाकांक्षी योजनेच्या व्यवस्थापन आणि अंमलबजावणीवरून तालुक्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली आहे. या पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष व काही सदस्य एका पक्षाशी संबंधित असून, थकीत वीज बिलांमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. याचा थेट परिणाम नियमित पाणी पुरवठ्यावर होत असल्याची ओरड होत आहे. तसेच, जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांची कंत्राटेही विशिष्ट राजकीय विचारसरणीच्या ठेकेदारांकडे असल्याचा आरोप महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

​या पार्श्‍वभूमीवर तळेगाव दिघे येथील पाणी पुरवठ्याबाबत उपसरपंच मयूर दिघे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नातून भागवतवाडी तलावातून तळेगावसाठी स्वतंत्र पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा आधीच कार्यान्वित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. चालू असलेल्या कामाचे काही मंडळी विनाकारण खोटे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

दरम्यान प्रशासकीय सूत्रांनुसार, येत्या दोन आठवड्यांत अंतिम चाचणी पूर्ण करून अधिकृत पाणीपुरवठा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !