धानोरे येथील दिघेवस्ती शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
◻️ चिमुकल्यानी विविध कलागुणांचे सादरीकरण करत जिंकली उपस्थितांची मने!
संगमनेर LIVE (सात्रळ) | राहुरी तालुक्यातील धानोरे शिवारातील दिघेवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित ‘कलाविष्कार चिमुकल्यांचा’ हे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच अत्यंत उत्साहात संपन्न झाले. चिमुकल्या विद्यार्थ्याच्या कलागुणांची मेजवानी अनुभवण्यासाठी ग्रामस्थ, पालक आणि शिक्षणप्रेमींनी या कार्यक्रमाला अभूतपूर्व गर्दी केली होती.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान परसराम हनुमंत दिघे यांनी भूषविले, तर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक रामचंद्र भाऊसाहेब देशमुख उपस्थित होते. दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
गणपती गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर विद्यार्थ्यानी एकापेक्षा एक सरस कार्यक्रमाचे सादरीकरण केले. ‘माऊली माऊली’, ‘मेरे घर राम आएंगे’ आणि ‘झुलवा पाळणा’ या गीतांवरील नृत्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला उजाळा देणारा ‘शिव तांडव’, ‘शिवकन्या’ आणि ‘कट्टर मावळा’ या गीतांवरील सादरीकरणांनी वातावरण शिवमय झाले होते. तसेच ‘गुलाबी साडी', ‘फ्युजन लावणी' आणि ‘मणिकर्णिका नृत्य' यांमधून विद्यार्थ्यानी आपल्यातील कलागुणांचे दर्शन घडवले.
यावेळी नाटिकेतून देखील विद्यार्थ्यानी सामाजिक संदेश दिला. ‘भोंदू बाबा’ या नाटिकेद्वारे अंधश्रध्दा निर्मूलनावर भाष्य करत सामाजिक प्रबोधन करण्यात आले. तर ‘स्वर्गात आकाशगंगा’ आणि ‘मिशन मंगल’ या सादरीकरणांतून विद्यार्थ्याची वैज्ञानिक कल्पकता आणि आधुनिक विचार दिसून आले. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यानी सादर केलेल्या सुमारे २० विविध कार्यक्रमांनी या स्नेहसंमेलनाला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली.
या सोहळ्यात धानोरे गावातील उच्च पदावर कार्यरत असलेल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. आपल्याच शाळेतील यशस्वी विद्यार्थ्याना पाहून सध्या शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास द्विगुणित झाला. देखणे स्टेज डेकोरेशन, आकर्षक विद्युत रोषणाई आणि उत्कृष्ट ध्वनीव्यवस्थेमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली होती.
शाळा ही केवळ अभ्यासाचेच केंद्र नसून व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्वाचे व्यासपीठ आहे, अशा शब्दांत उपस्थितानी विद्यार्थ्याच्या प्रगतीचे कौतुक केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक प्रभाकर शिंदे यांच्यासह सर्व शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती, सांस्कृतिक समिती आणि ग्रामस्थांनी मिळून परिश्रम घेतले. तर, परीक्षक म्हणून पोपटराव पवार व गीताराम पवार यांनी जबाबदारी पार पाडली.
दरम्यान, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र बोकंद व विद्याताई बोकंद यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार मानून या दिमाखदार सोहळ्याची सांगता झाली. अशी माहिती पत्रकार समर्थ वाकचौरे यांनी कळवली आहे.