पावसाळ्यापूर्वी नगर-मनमाड महामार्ग खुला होणार - डॉ. सुजय विखे पाटील

संगमनेर Live
0
पावसाळ्यापूर्वी नगर-मनमाड महामार्ग खुला होणार - डॉ. सुजय विखे पाटील

◻️ राहाता शहरातील ​व्यापाऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी डिझाइनमध्ये बदल

संगमनेर LIVE (शिर्डी) | नगर-मनमाड महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, राहाता शहरातील रस्त्याचे काम येत्या एका महिन्यात पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी तो नागरिकांच्या सेवेसाठी खुला केला जाईल, अशी ग्वाही भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. सोमवारी (दि. १३) सकाळी त्यांनी प्रत्यक्ष महामार्गावर उतरून कामाचा आढावा घेतला.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयापासून साकुरी फाटा आणि मार्केट कमिटी परिसरापर्यंतच्या कामाची सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत नगराध्यक्ष स्वाधीन गाडेकर, स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी आणि राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी उपस्थित होते. महामार्गाच्या कामात व्यापारी वर्गाला कोणताही त्रास होऊ नये, यासाठी त्यांनी गटर्स, डिव्हायडर आणि रस्त्यांच्या रुंदीकरणाबाबत महत्त्वाच्या तांत्रिक सूचना दिल्या.

रस्त्याच्या सुरुवातीच्या कामात साईड लेव्हल्स जास्त उंच असल्याने स्थानिक व्यापाऱ्यांना अडचणी येण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकार आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्याच्या डिझाइनमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. आता रस्त्याची उंची नियंत्रित ठेवण्यात आली असून, यामुळे कोणत्याही व्यावसायिकाचे नुकसान होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली गेली आहे.

या महामार्गाचे काम करताना आधुनिक सोयी-सुविधांवर भर देण्यात आला आहे. जुने डिव्हायडर पूर्णपणे हटवून त्याऐवजी एकसंध आणि सुबक डिव्हायडर उभारले जाणार आहेत, तर रस्त्यातील जुनी झाडे आणि पोल यांचे योग्य नियोजन करून रस्त्याची रुंदी आणि दृष्यता वाढवण्यात येणार आहे. शहरांतर्गत भागात पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी गटर लाईनपासून दोन्ही बाजूंना साधारण दोन मीटर अंतरात पेव्हिंग ब्लॉक बसवून सुरक्षित फूटपाथ विकसित केले जातील. तसेच, प्रकाश व्यवस्थेसाठी शहरात इलेक्ट्रिकल स्ट्रीट लाईट आणि शहराबाहेरील हायवे परिसरात सोलर लाईट बसवून वीजबिलाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला जाणार आहे.

गेल्या काही काळातील अपघातांची मालिका पाहता हा रस्ता लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. “हा रस्ता लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आणि शहराच्या विकासासाठी आहे. यामध्ये जर कोणी राजकीय हेतूने किंवा वैयक्तिक कारणाने अडथळा निर्माण केला, तर तो कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, त्याला माफ केले जाणार नाही,” असा कडक इशारा डॉ. विखे पाटील यांनी यावेळी दिला.

दरम्यान, अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !