पाणीटंचाईचे प्रस्ताव येताच तात्काळ टॅकर सुरू करा!
◻️ आमदार अमोल खताळ यांच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना
संगमनेर LIVE | “टंचाईच्या काळात जनतेला पाणी देणे ही आपली सर्वाची नैतिक आणि प्रशासकीय जबाबदारी आहे. ज्या ठिकाणी पाणीटंचाई भासत आहे, त्या भागाचा प्रस्ताव येताच कोणत्याही तांत्रिक कारणास्तव विलंब न लावता तत्काळ पाण्याचे टॅकर सुरू करा,” अशा सक्त सूचना आमदार अमोल खताळ यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
संगमनेर येथील प्रांताधिकारी कार्यालयात सोमवारी आमदार खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पाणीटंचाई आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला प्रशासकीय अधिकाऱ्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम कोल्हेवाडी फाटा येथे काही जणांकडून अडवले जात असल्याची तक्रार कार्यकर्त्यांनी केली. याची गंभीर दखल घेत आमदार खताळ यांनी प्रांताधिकारी आणि पोलीस उपाधीक्षकांना स्पष्ट निर्देश दिले की, कामात अडथळा आणणाऱ्यांवर प्रसंगी पोलीस बंदोबस्त लावा, पण हे काम येत्या ८ ते १० दिवसांत पूर्ण झालेच पाहिजे. पाण्याच्या नियोजनाअभावी घुलेवाडीतील नागरिकांना ग्रामपंचायतीवर मोर्चा काढावा लागला, याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
ग्रामपंचायत कार्यालयात बसून राहण्यापेक्षा प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन पाणीपुरवठ्याची पाहणी करा आणि सर्वांना सम प्रमाणात पाणी कसे मिळेल याचे चोख नियोजन करा, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. यावर उपाययोजना म्हणून मालपाणी उद्योग समूह इरिगेशन भागातील तळे व प्रवरा नदीवरील विहीर अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाकडून देण्यात आली.
आमदार खताळ यांनी जलजीवन मिशनच्या कामातील दिरंगाईवर तीव्र संशय व्यक्त करताना अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “पालकमंत्र्यांनी आणि मी स्वतः वारंवार आढावा घेऊनही कामे अद्याप अपूर्ण का? अधिकारी केवळ कागदावर काम पूर्ण असल्याचे सांगून कंत्राटदारांना पाठीशी घालत आहेत का?” असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान या योजनेची सत्य परिस्थिती तपासण्यासाठी येत्या १५ दिवसांत मी स्वतः महायुतीच्या कार्यकर्त्यासह प्रत्येक गावात जाऊन कामांची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.