“गाफील राहिलो की कार्यक्रम लागतो; संगमनेर हे उदाहरण!” - सुजय विखे पाटील
◻️ वांबोरी येथे प्रचारादरम्यान भविष्यात जिल्ह्यात तीन मतदारसंघ होण्याचे केले सुतोवाच
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | "निवडणुकीत गाफील राहिलो की कार्यक्रम लागतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे संगमनेर होय. तिथे जनता ऐकायला तयार नव्हती आणि माझाही कार्यक्रम लोकांनी फिट केला,” अशा शब्दांत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राजकीय वास्तव मांडत कार्यकर्त्याना सावध केले.
राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजप-महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ वांबोरी येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
नगरमधील पराभवाचा संदर्भ देत डॉ. विखे पाटील म्हणाले की, “त्या निवडणुकीत ‘हिरा’ निवडून आला, तो इतका तेजस्वी आहे की जिल्ह्यातील प्रत्येक वादात त्याचे नाव येते. मला पाडले नसते तर मी इतर मतदारसंघांत गेलो नसतो, पण मला पाडण्यासाठी मोठे रिंगण लावले गेले आणि ते यशस्वी झाले. मात्र, माजी खासदार असतानाही लोकांनी मला जे प्रेम दिले, ते केवळ केलेल्या विकासकामांच्या जोरावर दिले आहे.”
वांबोरी परिसराच्या विकासाचा रोडमॅप मांडताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, येथील युवकांसाठी एक अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यात येणार असून त्याद्वारे दर्जेदार खेळाडू घडवण्यास मदत होईल. तसेच, सिंचनाच्या प्रश्नावर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, वांबोरी चारी टप्पा दोनचे काम तातडीने मार्गी लावले जाईल आणि जुनी शासकीय चारी पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.
गेल्या ४० वर्षांपासून रखडलेली साकळाई पाणी योजना आम्ही यशस्वीपणे पूर्ण केली असून, आता या भागातील जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली आणण्याचे आमचे ठोस नियोजन आहे. याशिवाय, १२ हजार टन क्षमतेचा साखर कारखाना सुरू झाल्यामुळे आता एकाही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्राजक्त तनपुरे यांनी निवडणूक न लढवण्याचा घेतलेला निर्णय सकारात्मक असल्याचे सांगत त्यांनी त्यांचे आभार मानले. “राहुरीतील अनेक वर्षाचा संघर्ष आता थांबला आहे. संघर्षातून अर्थकारण वाढते पण विकास होत नाही. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी केलेली कामे मोठी आहेत, त्यांची परतफेड करण्यासाठी अक्षय कर्डिले यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्या," असे आवाहन त्यांनी केले.
उमेदवार अक्षय कर्डिले यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “माझ्या वडिलांनी राहुरीच्या विकासाचे जे स्वप्न पाहिले होते, ते मला पूर्ण करायचे आहे. सर्वाना सोबत घेऊन मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मी कटिबध्द आहे. मतदारांनी केवळ विकासाच्या मुद्द्यावर मला साथ द्यावी.”
ज्येष्ठ नेते सुभाष पाटील यांनीही बाळासाहेब विखे पाटील आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा देत, काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. या बैठकीमुळे वांबोरी परिसरात अक्षय कर्डिले यांच्या प्रचाराला मोठी गती मिळाली असून कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.