“जो पाणी देईल, त्यालाच मतदान करा” - डॉ. सुजय विखे पाटील

संगमनेर Live
0
“जो पाणी देईल, त्यालाच मतदान करा” - डॉ. सुजय विखे पाटील 

◻️ अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ डॉ. विखे सह आमदार मोनिका राजळेचां झंझावाती प्रचार 

संगमनेर LIVE (​तिसगाव, राहुरी) | राहुरी - नगर - पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे. भाजपा-महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ मिरी, लोहसर आणि तिसगाव परिसरात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. “जिल्ह्यातील बिनविरोध निवडणुकीची परंपरा मोडीत काढून विरोधकांनी ही निवडणूक लादली आहे,” असे म्हणत त्यांनी या परिस्थितीला दुर्दैवी म्हटले.

​यावेळी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. “एखाद्या लोकप्रिय नेत्याच्या निधनानंतर पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची जिल्ह्याची परंपरा आहे. मग बारामतीमध्ये एक न्याय आणि राहुरीसाठी दुसरा न्याय का?” असा सडेतोड सवाल त्यांनी उपस्थित केला. राजकारण करण्याच्या नादात विरोधकांनी जनतेवर ही निवडणूक लादल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

​जिरायत भागाच्या विकासासाठी पाणी हीच मुख्य गरज असल्याचे सांगत डॉ. विखे पाटील म्हणाले, “जो शेतीला पाणी देईल, त्यालाच निवडून द्या. वांबोरी चारीचे पाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.” ३९ गावांसाठी जीवनवाहिनी असलेल्या वांबोरी पाणी योजनेचा दुसरा टप्पा वेगाने पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

​येत्या २३ तारखेला होणाऱ्या मतदानासाठी कार्यकर्त्यानी सज्ज व्हावे, असे आवाहन करताना त्यांनी ‘माझं बूथ, माझी जबाबदारी’ हा मंत्र दिला. सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेत ९५ टक्क्यांहून अधिक मतदान घडवून आणण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याने घ्यावी, असे सांगत अक्षय कर्डिले यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

​आमदार मोनिका राजळे या स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याचा गौरव करताना म्हणाल्या की, “कर्डिले साहेबांनी ३९ गावांतील प्रत्येक माणसाशी जिव्हाळ्याचे नाते जपले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, सभामंडप आणि पाणी योजना या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलला. हाच विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी अक्षय कर्डिले यांना साथ द्या.”

दरम्यान, ​या बैठकीला महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, सरपंच, विविध संस्थांचे अध्यक्ष आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी सर्व कार्यकर्त्यानी अक्षय कर्डिले यांच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !