संविधानामुळेचं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी - आमदार अमोल खताळ
संगमनेरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास अभिवादन
संगमनेर LIVE | “भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच आज देशातील सर्वसामान्य नागरिकांना मान-सन्मान मिळत आहे. याच संविधानाच्या बळावर माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला या तालुक्याचे लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.”असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संगमनेर येथे आमदार खताळ यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार खताळ यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, “पूर्वी समाजात मोठी विषमता, अस्पृश्यता आणि शिक्षणाबाबत अनास्था होती. मात्र, डॉ. आंबेडकरांनी ‘शिका, संघटित व्हा आणि लढा’ हा क्रांतीकारक मंत्र देऊन समाजातील ही दरी मिटवण्याचे ऐतिहासिक कार्य केले. आज प्रत्येक समाजघटकाला जो न्याय मिळतोय, त्याचे पूर्ण श्रेय बाबासाहेबांच्या संविधानाला जाते. आम्ही केवळ भाषणांपुरते किंवा निवडणुकांपुरते शाहू - फुले - आंबेडकरांचे नाव घेत नाही, तर त्यांचे विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवत आहोत.”
स्थानिक राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना आमदार खताळ यांनी विरोधकांच्या कार्यपध्दतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. संगमनेरमध्ये मागील राज्यकर्त्यानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय सुरू करण्याचा जो पायंडा पाडला, त्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
पुतळ्याच्या टेंडरवरून सुरू असलेल्या राजकारणात आपल्याला रस नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी विकासावर भर दिला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळाही उभारला जाणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान या अभिवादन कार्यक्रमाला महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बाबासाहेबांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.