संगमनेरमध्ये महामानवाच्या जयंती उत्सवात ‘डीजे’ वरून रणकंदन!

संगमनेर Live
0

संगमनेरमध्ये महामानवाच्या जयंती उत्सवात ‘डीजे’ वरून रणकंदन!

◻️ व्याख्यानात अडथळा; आमदार सत्यजीत तांबे आणि उत्कर्षा रुपवते संतापले

​संगमनेर LIVE | जगाला समता आणि मानवतेचा संदेश देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संगमनेरमध्ये उत्साहाचे वातावरण असताना, या उत्सवाला गालबोट लागले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित व्याख्यान आणि पुरस्कार सोहळा सुरू असताना, आमदार अमोल खताळ यांच्या कार्यकर्त्यानी लावलेल्या कर्णकर्कश डीजेमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

शहरातील ​डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर प्रतिष्ठानच्या वतीने वैचारिक व्याख्यान आणि जीवनगौरव पुरस्काराचे वाटप सुरू होते. शांततेत आणि शिस्तबध्द पद्ध्तीने हा सोहळा सुरू असतानाच, महामानवाला अभिवादन करण्यासाठी आमदार अमोल खताळ दाखल झाले. यावेळी त्यांच्या समवेत आलेल्या कार्यकर्त्यानी डीजेचा मोठा आवाज सुरू केला. विशेष म्हणजे, या डीजेवर वाजवण्यात येत असलेली गाणी महामानवाच्या जयंतीला साजेशी नसून ती ‘अशोभनीय’ होती, असा गंभीर आरोप केला जात आहे.

​यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमदार सत्यजीत तांबे यांनी पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर ताशेरे ओढले. ते म्हणाले, “आम्ही गेल्या ४० वर्षापासून सर्व धर्मीयांना सोबत घेऊन जयंती साजरी करत आहोत, पण असा प्रकार कधीच घडला नाही. महामानवाचे विचार सांगण्याचे काम सुरू असताना मुद्दाम अडथळे निर्माण करणे हे अत्यंत चुकीचे आहे.” तांबे यांनी तात्काळ पोलीसांना हस्तक्षेप करून डीजे बंद करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर काही काळ तणाव निवळला असला, तरी काही वेळाने पुन्हा डीजे सुरू झाल्याने वातावरण अधिकच तापले.

​कार्यक्रमात वारंवार होणारा ‘अडथळा’ पाहून वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते आणि ज्येष्ठ कार्यकर्त्या कुसुमताई माघाडे यांनी थेट डीजे सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन जाब विचारला. “संगमनेरमध्ये अशी बेशिस्त पध्दत कधीच नव्हती, तुम्ही हे घाणेरडे प्रकार सुरू केले आहेत.” अशा शब्दांत त्यांनी आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याना फटकारले. तर, यावेळी कार्यकर्त्यानी माघाडे ताईशी उध्दट वर्तन केल्याने प्रतिष्ठानचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले आणि परिसरात तणाव वाढला.

​या वादावादीमुळे आणि समर्थकांच्या गर्दीमुळे संगमनेरमधील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची मोठी कोंडी झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून प्रांताधिकारी, तहसीलदार आणि पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. प्रशासनाला परिस्थिती नियंत्रणात आणताना मोठी कसरत करावी लागली. दरम्यान, ही प्रवृत्ती लोकशाहीला घातक असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त करताना “म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतोय” असे म्हणून घटनेचा निषेध केला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !