महंत भास्करगिरी महाराजांची बाळासाहेब थोरातांनी सांत्वनपर भेट घेतली
◻️ देवगड हे सामाजिक सलोख्याचे आणि समृध्द संत परंपरेचे केंद्र - बाळासाहेब थोरात
संगमनेर LIVE (नेवासे) | नेवासे तालुक्यातील तीर्थक्षेत्र देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांच्या मातोश्री सरूबाई पेसोडे यांचे नुकतेच निधन झाले. या दुःखद प्रसंगी काॅग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देवगड येथे जाऊन भास्करगिरी महाराज यांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.
देवगड देवस्थान हे केवळ नेवासे तालुक्याचेच नव्हे, तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील भाविकांचे एक महत्त्वाचे श्रध्दास्थान आहे. महंत भास्करगिरी महाराजांच्या मातोश्रींच्या निधनामुळे या आध्यात्मिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. महाराजांना झालेल्या या मातृशोकामुळे परिसरातून मोठे दुःख व्यक्त होत आहे.
सांत्वनपर भेटीदरम्यान बाळासाहेब थोरात म्हणाले की, “महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी महाराष्ट्राच्या महान संत परंपरेचा वारसा अत्यंत निष्ठेने जोपासला आहे. त्यांनी केवळ धार्मिकच नव्हे, तर सामाजिक सलोख्याचे कार्य करत या मठाला एक मोठे अधिष्ठान मिळवून दिले आहे. त्यांच्या मातोश्रींचे निधन ही त्यांच्या कुटुंबासाठी आणि भक्त परिवारासाठी मोठी हानी आहे. या कठीण काळात आम्ही सर्वजण महाराजांच्या दुःखात सहभागी आहोत.”
यावेळी थोरात यांच्यासोबत जिल्हा काॅग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर, काॅग्रेसचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, वारकरी संप्रदायाचे पाईक म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब थोरात यांनी नेहमीच संत-महंतांप्रती आदराची भावना जपली आहे, याची प्रचिती या भेटीतून पुन्हा एकदा आली.