शिर्डीत डॉ. सुजय विखे पाटलांच्या हस्ते ‘सालबर्डी’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

संगमनेर Live
0
शिर्डीत डॉ. सुजय विखे पाटलांच्या हस्ते ‘सालबर्डी’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

◻️ जिल्ह्याच्या भूमिपुत्रांचा भोंदूगिरीविरोधात जनजागृतीचा विडा

संगमनेर LIVE (​शिर्डी) | साईबाबांच्या पावन भूमीत आज एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ‘नेबूला फिल्म’ निर्मित आणि बहुप्रतीक्षित अशा ‘सालबर्डी’ या मराठी चित्रपटाचे भव्य पोस्टर अनावरण माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले. हा चित्रपट केवळ मनोरंजन नसून समाजातील एका ज्वलंत विषयावर प्रकाश टाकणारा कलाविष्कार असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

​चित्रपटाची पार्श्‍वभूमी नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील ‘चांदा' येथे घडलेल्या अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक बालहत्याकांडावर आधारित आहे. समाजात आजही मुळा धरून असलेल्या जादूटोणा, अंधश्रध्दा आणि भोंदूगिरीच्या विळख्यात अडकून निष्पाप जीवांचा बळी कसा जातो, याचे जळजळीत वास्तव या चित्रपटातून मांडण्यात आले आहे.

​यावेळी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, “चित्रपटाचे निर्माते देवडे पाटील हे आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत. समाजात वाढणारी भोंदूगिरी आणि जादूटोणा थांबवण्यासाठी अशा चित्रपटांची निर्मिती होणे काळाची गरज आहे. लोकांनी देवावर आणि परमार्थावर जरूर श्रध्दा ठेवावी, पण भोंदू बाबांच्या आहारी जाऊन स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करू नये.” त्यांनी पुढे नमूद केले की, विखे पाटील परिवाराने नेहमीच मराठी चित्रपटसृष्टीला आणि स्थानिक कलाकारांना बळ दिले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे मोठे कार्य होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

​नेबूला फिल्म्सच्या वतीने निर्माते देवडे पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, जादूटोणा आणि भोंदूगिरीविरोधी लढा हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. ग्रामीण भागातील वास्तव चित्रण आणि संवादांची धार ही या चित्रपटाची जमेची बाजू मानली जात आहे. या चित्रपटामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामांकित कलाकारांसह स्थानिक प्रतिभावान कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. पोस्टर अनावरणाच्या या खास प्रसंगी चित्रपटाचे दिग्दर्शक, तांत्रिक चमू आणि चित्रपटातील सर्व प्रमुख कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, ​पोस्टर अनावरणानंतर अभिनेत्री पूजा सावंत, भारत गणेशपुरे, निर्माते दराडे यांच्यासह चित्रपटाच्या संपूर्ण टीमने श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली. शिर्डी ग्रामस्थ आणि विखे पाटील परिवाराच्या वतीने सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या मातीतील निर्मात्याने बनवलेला हा दर्जेदार आणि सामाजिक संदेश देणारा ‘सालबर्डी’ चित्रपट चित्रपटगृहात जाऊन आवर्जून पाहावा आणि मराठी चित्रपटसृष्टीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !