जलव्यवस्थापन केवळ कागदावर नको, प्रत्यक्ष कृतीतून राबवा - आमदार अमोल खताळ

संगमनेर Live
0
जलव्यवस्थापन केवळ कागदावर नको, प्रत्यक्ष कृतीतून राबवा - आमदार अमोल खताळ

◻️ संगमनेरमध्ये ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन पंधरवडा’ उत्साहात साजरा

​संगमनेर LIVE | “जलव्यवस्थापन यशस्वी करण्याची जबाबदारी केवळ शासन किंवा अधिकारी - कर्मचाऱ्यांची नसून, यात शेतकरी आणि कार्यकर्त्याचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. हा पंधरवडा केवळ कागदावर मर्यादित न राहता, तो प्रत्यक्षात प्रभावीपणे राबविला जाणे काळाची गरज आहे,” असे स्पष्ट प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.

​गोदावरी, मराठवाडा व कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाच्या वतीने संगमनेर महाविद्यालयात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६’चा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी आमदार खताळ बोलत होते.

​आमदार खताळ म्हणाले की, सह्याद्रीच्या घाट माथ्यावरून समुद्राला वाहून जाणारे पाणी नदीजोड प्रकल्पाद्वारे गोदावरी खोऱ्यात वळविणे हे माजी खासदार स्व. बाळासाहेब विखे पाटील यांचे स्वप्न होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पास हिरवा कंदील दिला असून, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्णत्वास जाईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

​कार्यक्रमात बोलताना आमदार खताळ यांनी निळवंडे धरणाच्या कामातील दिरंगाईवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “मध्य प्रदेशातील मोहनपुरा धरण केवळ १० वर्षात पूर्ण होऊ शकते, तर मग निळवंडे धरणास ५२ वर्षे का लागली? समन्यायी पाणी वाटपाच्या नावाखाली संगमनेरच्या हक्काच्या पाण्यावर अन्याय झाला आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाला असता, तर आज आमचा शेतकरी अधिक सुखी आणि समाधानी असता.”

​याप्रसंगी निवृत्त अभियंता उत्तम निर्मळ यांनी तांत्रिक मार्गदशन करताना पाण्याचे महत्त्व विशद केले. पाणी हेच जीवन असल्याने त्याचा अत्यंत काटकसरीने वापर करणे आवश्यक असून, वाढते तापमान आणि पावसातील खंड लक्षात घेऊनच शेतकऱ्यांनी पिकांची निवड करावी, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच, शेतकऱ्यांनी स्वतःहून पाणी वापर संस्थांची स्थापना करून त्यावर आपला मालकी हक्क प्रस्थापित करावा आणि पश्चिमेकडील समुद्राला वाहून जाणारे पाणी भंडारदरा, मुळा किंवा दारणा धरणात वळविण्याचा संकल्प पूर्ण केल्यास भविष्यातील सिंचनाचा प्रश्न कायमचा सुटू शकेल, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान ​कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता अमोल कवडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन महेश गायकवाड यांनी मानले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !