“येत्या ३ महिन्यात महामानवाचा भव्य पुतळा उभा करणार” - डॉ. सुजय विखे पाटील

संगमनेर Live
0
“येत्या ३ महिन्यात महामानवाचा भव्य पुतळा उभा करणार” - डॉ. सुजय विखे पाटील 

​◻️ श्रीरामपूर येथे डॉ. सुजय विखे यांचा ‘समाज भूषण पुरस्कारा’ने गौरव

संगमनेर LIVE (​श्रीरामपूर) | भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना गुरुवारी (दि. १६) श्रीरामपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने ‘समाज भूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्यात बोलताना त्यांनी शहरातील प्रलंबित पुतळ्याच्या प्रश्नावर महत्त्वाची घोषणा केली. “येत्या ३ महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पूर्णआकृती पुतळा उभा करू,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी समस्त श्रीरामपूरकरांना दिली.

​स्मारकाच्या कामावरून सुरू असलेल्या राजकारणावर डॉ. विखे पाटील यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले. ते म्हणाले, “या विषयात कोणीही श्रेयावादाची लढाई करू नये. आजवर अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधींनी आणि समाज बांधवांनी या स्मारकासाठी योगदान दिले आहे. आता जे काम शिल्लक राहिले आहे, त्यात आमचा खारीचा वाटा असेल. किमान महामानवांना तरी राजकारणाच्या कक्षेबाहेर ठेवा,” अशी विनंती त्यांनी स्थानिक राजकारण्यांना केली.

​उभारले जाणारे स्मारक हे केवळ एक शिल्प नसून ती बाबासाहेबांप्रती असलेली आस्था असेल, असे त्यांनी नमूद केले. “हा पुतळा इतका भव्य आणि देखणा असेल की, श्रीरामपूरमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात बाबासाहेबांच्या कार्याप्रती असलेली निष्ठा अधिक बळकट होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“पुरस्कार लहान किंवा मोठा नसतो, तो देणाऱ्याची भावना महत्त्वाची असते. आज मी येथे पुरस्कार स्वीकारण्यासाठी नाही, तर स्मारक समितीने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी आलो आहे,” असे प्रतिपादन देखील डॉ. विखे पाटील यांनी केले.

दरम्यान, ​या सोहळ्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी, भाजप आणि महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !