राहुरीच्या बुळे पठारावर पाण्यासाठी महिलांची वणवण!
◻️ टॅकरची मागणी कागदावरच, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
संगमनेर LIVE (म्हैसगाव) | राहुरी तालुक्यातील चिखलठाण अंतर्गत येणाऱ्या बुळे पठार परिसरातील आदिवासी वाड्यांमध्ये सध्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने विहिरी, बोअरवेल आणि ओढे कोरडे पडले असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना मैलोन्मैल भटकंती करावी लागत आहे. विशेष म्हणजे, वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून टॅकर सुरू न झाल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना दररोज अनेक किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. तासनतास रांगेत उभे राहूनही अनेकदा रिकाम्या हंड्याने परतण्याची वेळ येत आहे. पाण्याअभावी हाताचे कामही बंद पडले असून, भविष्यात उपासमारीची वेळ येते की काय, अशी भीती आदिवासी बांधवांनी व्यक्त केली आहे.
केवळ माणसांनाच नव्हे, तर पाळीव प्राण्यांनाही भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जनावरांच्या चाऱ्यासोबतच पाण्याचा प्रश्न मिटत नसल्याने त्यांचेही हाल होत आहेत. या परिस्थितीमुळे पशुपालक हवालदिल झाले आहेत.
ग्रामपंचायतीमध्ये सध्या सरपंच पद रिक्त असल्याने प्रशासक आणि ग्रामसेवक या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असल्याने लोकप्रतिनिधींचेही या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आम्हाला तहानलेलेच राहावे लागणार का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
दरम्यान या भीषण टंचाईबाबत राहुरीचे तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. प्रशासनाने तात्काळ टॅकर सुरू करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मच्छिंद्र दुधवडे, रघुनाथ बुळे आणि इतर ग्रामस्थांनी दिला आहे. अशी माहिती पत्रकार कमलेश विधाटे यांनी कळविली आहे.