सात्रळच्या ‘आनंद गुरुकुल’मध्ये गुणवंतांचा गौरव!
◻️ विविध स्पर्धामधील यशस्वी विद्यार्थ्याचा सन्मान आणि मार्गदर्शन
संगमनेर LIVE (सात्रळ) | राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील आनंद गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न झाला. शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात शाळेचा नावलौकिक उंचावणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्याचा यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून योगेश चोरमुंगे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आली.
या सोहळ्यात विद्यार्थ्याच्या अष्टपैलू कामगिरीचे कौतुक करताना त्यांना विविध विभागांत पारितोषिके प्रदान करण्यात आली. ऑलिंपियाड अंतर्गत इंग्लिश, गणित, विज्ञान आणि सामान्य ज्ञान या विषयांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच टीआयएसडी (TISD) मुंबई यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित “संविधान लेखन” हस्ताक्षर स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
याचबरोबर शाळेत संपन्न झालेल्या विज्ञान प्रदर्शनात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या बालवैज्ञानिकांना प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यासोबतच शाळेच्या शिक्षिका सौ. मंजुषा घोलप यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
प्रमुख पाहुणे योगेश चोरमुंगे विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना म्हणाले “स्पर्धा परीक्षेच्या युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि सातत्य या सूत्राचा अवलंब करावा आणि केवळ पुस्तकी ज्ञान न घेता सर्वागीण प्रगतीवर भर देऊन आपले भविष्य उज्ज्वल करावे,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
दरम्यान, या सोहळ्यासाठी शाळेचे चेअरमन डॉ. के. के. बोरा, कार्यकारी अध्यक्ष राहुल बोरा, प्राचार्या श्रीमती प्रधान, उपप्राचार्या श्रीमती साबळे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती पत्रकार समर्थ वाकचौरे यांनी कळवली आहे.