वडगावपान येथील भोंदू बाबा विरूध्द रात्री उशिरा गुन्हा दाखल; दोघे ताब्यात
◻️ बरा करण्याचे आणि मूल होण्याचे खोटे आमिष दाखवून लाखो रुपये उकळले
संगमनेर LIVE | स्वतःला दैवी शक्ती असल्याचा बनाव करून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या आणि गंभीर आजार बरे करण्याचे खोटे दावे करणाऱ्या भोंदू महाराज राजेंद्र बापू गडगे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील वडगावपान येथे सुरू असलेल्या या प्रकाराप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्य आरोपीसह दोघांना पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र गडगे याने वडगावपान येथे ‘दत्तधाम सरकार' नावाचे यूट्यूब चॅनल सुरू करून त्याद्वारे मंत्रशक्ती आणि दैवी शक्तीने कर्करोगासारखे दुर्धर आजार बरे करतो, असा खोटा प्रचार सुरू केला होता. ज्या महिलांना अपत्यप्राप्ती होत नाही, त्यांना मूल करून देण्याचे आणि घरातील विविध समस्या दूर करण्याचे आमिष दाखवून तो लोकांच्या विश्वाचा गैरफायदा घेत असे. या दाव्यांवर विश्वाचा ठेवून त्याच्याकडे येणाऱ्या भाविकांकडून त्याने ११ हजार, २१ हजार ते ५१ हजार रुपयांपर्यंतची मोठी रक्कम उकळल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे, तर उपचाराच्या नावाखाली तो पालापाचोळ्याचे औषध देऊन लोकांकडून पैसे उकळत असे, ज्याच्या सेवनामुळे अनेकांना उलट शारीरिक त्रास सहन करावा लागल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
गेल्या सुमारे दहा वर्षांपासून राजेंद्र गडगे हा गरजू व अडचणीत सापडलेल्या लोकांचे आर्थिक, शारीरिक आणि मानसिक शोषण करत होता. स्वतःमध्ये दैवी शक्ती असल्याचा आव आणून त्याने परिसरात भीतीचे वातावरणही निर्माण केले होते. या गंभीर प्रकाराची दखल घेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव अॅड. रंजना गवांदे यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी राजेंद्र बापू गडगे, डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे, सुरज शिंदे आणि मधुकर शिंदे या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून राजेंद्र गडगे व मधुकर शिंदे यांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, पोलिसांनी या आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या विविध कलमांसह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३ तसेच ड्रग्स अँड मॅजिक रेमिडीज अॅक्ट आणि मेडिकल प्रॅक्टिशनर अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे करत आहेत.