महिलेचा व्हॉट्सॲप मेसेज अन् आमदार अमोल खताळ यांची धडक कारवाई!
◻️ तलाठी गायब, कोतवाल बेपत्ता.. कार्यालयाचा ताबा ‘एजंटां’कडे! आमदारांनी रंगेहात पकडले
संगमनेर LIVE | संगमनेर शहरातील चावडी येथील तलाठी कार्यालयात सुरू असलेला शासकीय कामाचा सावळागोंधळ आणि सर्वसामान्यांची होणारी अडवणूक आता उघडकीस आली आहे. दिव्यांग आणि वयोवृध्द नागरिकांकडून पैशांची मागणी होत असल्याची तक्रार मिळताच आमदार अमोल खताळ यांनी थेट कार्यालयात धडक देऊन ‘एजंटगिरी’चा पर्दाफाश केला. या गंभीर प्रकारानंतर संबंधित दोषींवर कठोर कारवाईच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
चावडी येथील तलाठी कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांना, विशेषतः दिव्यांग आणि वृध्दाना वारंवार हेलपाटे मारायला लावून पैशांची मागणी केली जात होती. या कामकाजात काही खासगी व्यक्तींचा हस्तक्षेप वाढल्याची तक्रार एका महिलेने आमदार अमोल खताळ यांना व्हॉट्सॲप मेसेजद्वारे केली होती. तक्रारीचे गांभीर्य ओळखून आमदारांनी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय कार्यालयास भेट दिली.
आमदार अमोल खताळ कार्यालयात पोहोचले तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले. कार्यालयात जबाबदार तलाठी किंवा कोतवाल उपस्थित नव्हते. त्याऐवजी मन्सूर शेख नावाची खासगी व्यक्ती शासकीय खुर्चीवर बसून अधिकृत कागदपत्रे हाताळत होती. सोबतच त्याचा नातेवाईकही तिथे उपस्थित होता. “तुम्हाला येथे बसण्याचा अधिकार कोणी दिला?” असा जाब विचारला असता, “तलाठी नसल्याने आम्हीच काम पाहत आहोत,” असे उर्मट उत्तर संबंधितांकडून देण्यात आले.
शासकीय कार्यालयात खासगी व्यक्तींचा वावर आणि त्यांच्यामार्फत होणारी वसुली हा बेकायदेशीर प्रकार असल्याचे स्पष्ट करत आमदार खताळ यांनी तातडीने प्रांताधिकारी अरुण उंडे आणि तहसीलदार धीरज मांजरे यांच्याशी संपर्क साधला. आमदारांच्या सूचनेनंतर प्रशासनाने नायब तहसीलदार भांगरे यांना घटनास्थळी पाठवले. सद्यस्थितीत संबंधित खासगी व्यक्तींना तेथून हटवण्यात आले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
आजच्या काळात लोकप्रतिनिधींकडे प्रत्यक्ष भेटण्यासाठीही वेळ नसतो, अशा वेळी केवळ एका व्हॉट्सॲप मेसेजची दखल घेऊन प्रत्यक्ष मैदानात उतरणाऱ्या आमदार खताळ यांच्या संवेदनशीलतेचे संगमनेरमध्ये कौतुक होत आहे. सामान्य माणसाचा आवाज ऐकणारा आणि त्यावर त्वरित कृती करणारा लोकप्रतिनिधी अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
दरम्यान, “शासकीय कार्यालयात खासगी व्यक्तींकडून कागदपत्रे हाताळली जाणे आणि नागरिकांची लूट होणे हे खपवून घेतले जाणार नाही. सर्वसामान्य जनतेची अडवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आणि त्यांच्या एजंटांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.” अशी प्रतिक्रिया आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर लाईव्हशी बोलताना दिली.