धांदरफळ येथे शेतकऱ्याचे भर उन्हात ‘रास्ता रोको’ आंदोलन
◻️ ११ तास वीज न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असतानाच, वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि कमी दाबाने मिळणारी वीज या समस्यांनी त्रस्त झालेल्या धांदरफळ परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. आपल्या विविध मागण्यांसाठी संतप्त शेतकऱ्यांनी भर उन्हात सुमारे चार तास ‘रास्ता रोको’ आंदोलन केले आणि वीज बोर्डाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध केला.
धांदरफळ खुर्द येथील वीज वितरण विभागाच्या कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये धांदरफळ बुद्रुक, सांगवी, नांदुरी दुमाला, निमज, मिर्झापूर यांसह पंचक्रोशीतील गावांचे शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उन्हामुळे पिके जळू लागली असून पशुधनाच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. अशा परिस्थितीत वीज पुरवठ्यात होणारे अडथळे शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारे ठरत आहेत.
या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात विविध प्रलंबित मागण्यांचा पाढा वाचला. यामध्ये प्रामुख्याने रोटेशन कालावधीत लवादाच्या निर्णयानुसार दिवसा ११ तास पूर्ण दाबाने वीज मिळावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली. तसेच तालुक्यातील जुने झालेले वीज खांब आणि लोंबकळणाऱ्या धोकादायक तारांचे त्वरित व्यवस्थापन करून पायाभूत सुविधांची दुरुस्ती करावी, अशी विनंती करण्यात आली. याशिवाय अकोले येथून येणाऱ्या ३३ केव्ही धांदरफळ फिडरचा कमी दाबाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवून प्रवरा नदीकाठी बंद अवस्थेत असलेले ट्रान्सफॉर्मर (DP) तात्काळ कार्यान्वित करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी आक्रमकपणे मांडली.
आंदोलनावेळी शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कारभारावर कडाडून टीका केली. “पूर्वीच्या काळात शेतकऱ्यांना हक्काची वीज मिळत होती, मात्र गेल्या दीड वर्षापासून सातत्याने दुर्लक्ष होत आहे,” असा आरोप यावेळी करण्यात आला. जर येत्या दोन दिवसांत ११ तास वीज पुरवठ्याचा प्रश्न सुटला नाही, तर गुराढोरांसह अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा तरुणांसह उपस्थित वृध्द शेतकऱ्यांनी दिला.
शेतकऱ्यांचा वाढता रोष पाहून वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. “वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तांत्रिक सुधारणा केल्या जातील आणि रोटेशन काळात ११ तास वीज देण्याबाबत वरिष्ठांशी बोलून एक-दोन दिवसांत लेखी कळवण्यात येईल,” असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. मात्र, दिलेला शब्द पाळला नाही तर पुन्हा रस्त्यावर उतरू, असा ठाम निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.