दिल्लीत पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर काॅग्रेसची बैठक संपन्न

संगमनेर Live
0
दिल्लीत पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर काॅग्रेसची बैठक संपन्न 

◻️ ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत भविष्यातील रणनीतीवर खलबते 

संगमनेर LIVE (​नवी दिल्ली) | देशातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच, काॅग्रेस पक्षाची सर्वात महत्त्वाची आणि धोरणात्मक निर्णय घेणारी ‘काॅग्रेस राष्ट्रीय कार्य समिती’ (CWC) ची बैठक नवी दिल्लीतील इंदिरा गांधी भवन येथे उत्साहात पार पडली. आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर बोलावण्यात आलेल्या या बैठकीत महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि कॉग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्याचे प्रतिनिधित्व करत महत्त्वाची भूमिका निभावली.

कॉग्रेसचे अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, के. सी. वेणुगोपाल आणि महाराष्ट्रातून बाळासाहेब थोरात यांच्यासह देशातील निवडक २१ दिग्गज नेते उपस्थित होते. या बैठकीत पक्षाची पुढील दिशा आणि ज्वलंत राष्ट्रीय प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

काॅग्रेस कार्य समितीला ऐतिहासिक महत्त्व आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी अशा महान नेत्यांनी या समितीच्या माध्यमातून देशाला दिशा दिली आहे. समता, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे कार्य ही समिती सातत्याने करत आली असून, आजही देशाची धोरणात्मक राजनीती ठरवण्यात या समितीचा सिंहाचा वाटा आहे.

या बैठकीत केवळ आगामी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या रणशिंगाबाबतच नव्हे, तर देशासमोरील विविध गंभीर आव्हानांवरही सखोल चर्चा करण्यात आली. प्रामुख्याने अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे उद्भवलेली परिस्थिती आणि त्यामध्ये देशाच्या फसलेल्या परराष्ट्र नीतीबद्दल नेत्यांनी चिंता व्यक्त केली. याचसोबत देशात वाढलेली प्रचंड महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरण्याची रणनीती आखण्यात आली. देशातील सामाजिक सलोखा राखण्यासाठी वाढता जातीय तणाव आणि धार्मिक ध्रुवीकरण यावर प्रभावी उपाययोजना करण्याबाबतही या बैठकीत प्रदीर्घ खलबते झाली.

महाराष्ट्राच्या राजकारणातील अनुभवी चेहरा म्हणून बाळासाहेब थोरात यांचा या राष्ट्रीय स्तरावरील बैठकीतील सहभाग महत्त्वाचा मानला जात आहे. राज्याच्या प्रश्नांसह राष्ट्रीय राजकारणात महाराष्ट्राचा आवाज त्यांनी या बैठकीत बुलंद केला. देशाची एकता आणि विकासासाठी काॅग्रेस पक्ष नव्या जोमाने जनतेमध्ये जाणार असल्याचा संदेश या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !