सरकारी योजनांसाठी कुणालाही पैसे देऊ नका; कुणी मागितल्यास संपर्क करा!

संगमनेर Live
0
सरकारी योजनांसाठी कुणालाही पैसे देऊ नका; कुणी मागितल्यास संपर्क करा!

◻️​ आमदार अमोल खताळ यांचा इशारा; बांधकाम कामगारांना साहित्याचे वाटप

​संगमनेर LIVE | “केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत, ज्यावर सर्वसामान्य जनतेचा कायदेशीर हक्क आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणालाही एक रुपयाही देण्याची गरज नाही. कुणी एजंट किंवा व्यक्ती पैशांची मागणी करत असेल, तर माझ्याशी थेट संपर्क साधा; संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल,” असा कडक इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला आहे.

​संगमनेर येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात बांधकाम कामगारांना साहित्याचे वाटप आमदार खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहाय्य कामगार आयुक्त रेवनाथ भिसले, कामगार अधिकारी स्वप्निल जाधव, दुकाने निरीक्षक ललित दाभाडे आणि महायुतीचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​यावेळी मार्गदर्शन करताना आमदार खताळ म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार हे कामगार, महिला, शेतकरी आणि तरुणांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. केवळ बांधकाम कामगारच नव्हे, तर घरेलू कामगारांनाही सरकार आर्थिक सहाय्य देत आहे.

​संगमनेर तालुक्यातील योजनांच्या प्रगतीबाबत माहिती देताना आमदार खताळ यांनी सांगितले की, तालुक्यामध्ये सध्या २४ हजार १२६ नोंदणीकृत बांधकाम कामगार असून विविध शासकीय योजनांद्वारे हजारो कुटुंबांना थेट लाभ मिळत आहे. विशेषतः शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून ६ हजार ८७७ लाभार्थी पाल्यांच्या बॅक खात्यावर सुमारे ७ कोटी ६० लाख रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे. यासोबतच कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि दैनंदिन गरजांसाठी सुरक्षा संच व अत्यावश्यक वस्तू संचांचे नियमित वाटप केले जात असून प्रशासकीय पातळीवर पारदर्शकपणे ही प्रक्रिया राबवली जात आहे.

​कामगारांच्या आरोग्याची सोय करण्यासाठी संगमनेरमध्येच अत्याधुनिक रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे. “या रुग्णालयामुळे भविष्यात संगमनेरमधील कामगारांना उपचारांसाठी पुणे, मुंबई किंवा नाशिक सारख्या मोठ्या शहरांत धाव घेण्याची गरज उरणार नाही,” असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

​कामगारांच्या मुला-मुलींनी केवळ पारंपारिक शिक्षण न घेता ‘एमएससी-आयटी’ सारखे कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करावेत. हे कोर्सेस शासकीय नोकरी मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असून बांधकाम विभागाच्या वतीने ते सुरू करण्यात आले आहेत, असे आवाहनही त्यांनी केले.

​महाविकास आघाडीवर टीका करताना खताळ म्हणाले की, “काही लोकांनी ‘लाडकी बहीण योजना’ बंद करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, जनतेच्या पाठिंब्यामुळे आणि महायुतीच्या निर्धाराने ही योजना यशस्वीपणे सुरू आहे आणि भविष्यातही ती सुरूच राहील.”
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !