आश्‍वी परिसरात पोलीस ‘अलर्ट मोड’वर, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

संगमनेर Live
0
आश्‍वी परिसरात पोलीस ‘अलर्ट मोड’वर, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

◻️ ​प्रतापपूर येथील बैठकीत सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांचा सुरक्षेचा कानमंत्र


संगमनेर LIVE |
संगमनेर तालुक्यातील आश्‍वी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून सशस्त्र चोरट्यांनी उच्छाद मांडला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर आश्‍वी पोलीस यंत्रणा आता पूर्णपणे सक्रिय झाली आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापपूर येथे सुरक्षा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

​शनिवारी पहाटे चोरट्यांनी उंबरी बाळापूर आणि आश्‍वी बुद्रुक येथे तीन ते चार ठिकाणी सशस्त्र चोऱ्या केल्या होत्या. यामध्ये लाखोंची रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. विशेष म्हणजे, उंबरी येथील घटनेत एका महिलेच्या कानाला गंभीर दुखापत झाली. त्या पाठोपाठ रविवारी पहाटे कोंची गावातील एका घरातून रोकड चोरीला गेल्याने पुन्हा खळबळ उडाली.

या पार्श्‍वभूमीवर सोमवारी (दि. २०) सायंकाळी प्रतापपूर ​येथील बैठकीत बोलताना सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांनी नागरिकांना सुरक्षेबाबत कानमंत्र दिले. नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने घरात मोठी रोकड किंवा मौल्यवान दागिने ठेवणे टाळावे आणि शक्य असल्यास त्या वस्तू बॅकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवाव्यात, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच आपल्या परिसरात कोणतीही अनोळखी व्यक्ती किंवा संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने शेजाऱ्यांना आणि पोलिसांना संपर्क करावा. 

विशेष म्हणजे, रात्री झोपताना दुचाकी आणि चारचाकी वाहणाच्या चाव्या काढून घ्याव्यात. दरवाजे उघडे न ठेवता त्यांना कुलुप लावावे. तसेच घराच्या मुख्य दरवाजाला आतून एक परात उभी करून ठेवावी, जेणेकरून कोणी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्यास परात पडून होणाऱ्या आवाजाने घरातील सदस्य तात्काळ सावध होतील, असेही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

​याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक दिपक बर्डे यांनी देखील नागरिकांना सुरक्षेबाबत सूचना दिल्या. दरम्यान, या बैठकीत ग्रामस्थांनी परिसरात रात्रीची गस्त वाढवावी आणि विशेष तपास पथके नेमून या सशस्त्र चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी केली. 

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !