उंबरी बाळापुरात बिबट्यांच्या हल्ल्यातून तरुण बालंबाल बचावला

संगमनेर Live
0
उंबरी बाळापुर येथे बिबट्यांच्या हल्ल्यातून तरुण बालंबाल बचावला

​◻️ पिंजरा लावण्याची स्थानिक ग्रामस्थांची मागणी


संगमनेर LIVE |
संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना ताज्या असतानाचं मंगळवारी (दि. २१) रात्री एका तरुणावर बिबट्याने हल्ला केला. सुदैवाने, या हल्ल्यातून हा तरुण बालंबाल बचावला असला तरी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उंबरी बाळापूर येथील युवराज सोपान बर्डे (वय २६) हे मंगळवारी रात्री ८:१५ वाजेच्या सुमारास गावात दूध घालून आपल्या घराकडे (बर्डे वस्ती) दुचाकीवरून निघाले होते. संपत बर्डे यांच्या घराजवळ पोहोचले असता, रस्त्याशेजारील झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झेप घेतली. अचानक झालेल्या या हल्ल्याने युवराज बर्डे हादरून गेले, मात्र प्रसंगावधान राखल्याने आणि दैव बलवत्तर म्हणून ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले.

या घटनेची माहिती मिळताच एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल बर्डे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना या घटनेबाबत माहिती दिली. तर, याच ठिकाणी सोमवारी (दि. २०) देखील बिबट्याने विठ्ठल साळुंखे (वय ५५) यांच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी घडलेल्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

दरम्यान, वनविभागाने तात्काळ पिंजरा लावून या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी संपत बर्डे, ज्ञानेश्‍वर बर्डे, प्रकाश बर्डे, राजू बर्डे, दौलत बर्डे, संकेत माळी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !