संतांची भेट ही पूर्वजन्मीच्या पुण्याईचे फळ - ह.भ.प. जयेश महाराज भाग्यवंत
◻️ सद्गुरु नारायणगिरी महाराज अखंड हरीनाम सप्ताह सोहळ्याचे दुसरे पुष्प
नेवासे येथे ब्रम्हलीन सद्गुरु नारायणगिरी महाराजांच्या स्मृती निमित्त आयोजित अखंड हरीनाम सप्ताह आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी कीर्तनपुष्प गुंफताना ते बोलत होते.
ह.भ.प. जयेश महाराजांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या ‘भाग्याचा उदय l ते हे जोडी संतपाय ll' या अभंगावर सुंदर निरूपण केले. यावेळी त्यांनी सांगितले की, संत एकनाथ महाराजांच्या मते, अस्ताला जाणाऱ्या सूर्याला थांबवणे किंवा स्वबळावर समुद्र पार करणे कदाचित शक्य होईल, पण जीवनात खऱ्या साधू-संतांची भेट होणे अत्यंत दुर्लभ आहे.
प्रपंचात प्रत्येक माणसाला सत्कर्मातून पुण्य मिळवण्याची अपेक्षा असते, मात्र माणसाने अर्थ आणि काम यासंबंधी मनात अतिरिक्त ओढ ठेवू नये. संपत्ती ही कोणाच्या इच्छेने येत नाही किंवा जातही नाही, त्यामुळे केवळ धन, पुत्र किंवा पत्नीच्या प्राप्तीलाच भाग्य मानू नये. आपल्यातील क्रोध आणि अहंकाराचा नाश होणे, हेच भाग्याचे खरे लक्षण आहे. ज्याला सर्व काही कळूनही ‘मला काहीच कळत नाही' अशी नम्र भावना ज्याच्या ठायी असते, त्यालाच आयुष्यात खऱ्या अर्थाने साधू भेट होते.
कीर्तनानंतर कार्यक्रमात सेवा देणाऱ्या विविध दात्यांचा महंत उध्दव महाराज मंडलिक (नेवासेकर) यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये बन्सीभाऊ आगळे, इंजि. अक्षय फोपसे, नानासाहेब भागवत, सीताराम झिने, विष्णुपंत ठोसर, डोंगरे कुटुंबीय, इंजि. बी. एस. सोनवणे आणि योगेश म्हस्के यांसह इतर सेवाभावी भक्तांचा समावेश होता.
दरम्यान, या सोहळ्याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, ह.भ.प. नंदकिशोर महाराज खरात, चांगदेव महाराज काळे, महंत रमेशानंदगिरी महाराज, गहिनीनाथ महाराज आढाव, विजय महाराज पवार, भगवान महाराज डीके, अंकुश महाराज जगताप, कृष्णा महाराज मोरे यांसह अनेक मान्यवर, भजनी मंडळ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.