शाश्वत शेतीसाठी जल व्यवस्थापन काळाची गरज - शास्त्रज्ञ शैलेश देशमुख
◻️ बाभळेश्वर येथे ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा कार्यशाळा’ संपन्न
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६’ निमित्ताने बाभळेश्वर येथे आयोजित शेतकरी कार्यशाळेत ते बोलत होते. ही कार्यशाळा जलसंपदा विभाग आणि राहाता तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली.
यावेळी मार्गदर्शन करताना शास्त्रज्ञ देशमुख यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सविस्तर विवेचन केले. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी आता पारंपरिक सिंचन पध्दती सोडून ठिबक आणि तुषार सिंचनासारख्या आधुनिक साधनांवर भर देणे आवश्यक आहे, जेणेकरून पाण्याचा अपव्यय टाळता येईल. बदलत्या ऋतूचक्रानुसार उपलब्ध पाण्याचे अचूक नियोजन करून कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या पीक पध्दतीची निवड करणे फायदेशीर ठरेल. तसेच जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी आणि भूगर्भातील पाणी पातळी वाढवण्यासाठी मृद व जलसंधारणाच्या विविध उपाययोजना लोकचळवळ म्हणून राबवल्या पाहिजेत, असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांनी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी ‘जलतारा’ तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले. तसेच, जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित ‘गोदा ते नर्मदा जलजागृती यात्रा’ (२५ ते २९ एप्रिल) मध्ये सर्व शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी सांगितले. रविवारी या यात्रेचे आगमन अहिल्यानगर जिल्ह्यात होत आहे.
या प्रसंगी जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता रजनीकांत कवडे, श्रीरामपूरचे शाखा अभियंता संजय कल्हापुरे, केंद्रातील शास्त्रज्ञ शांताराम सोनवणे, डॉ. विलास घुले, डॉ. प्रियंका खर्डे, सज्जला लांडगे, डॉ. विठ्ठल विखे, शाखा अभियंता सिध्दांत शिंदे यांच्यासह कृषी व जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रियंका खर्डे यांनी केले, तर आभार रजनीकांत कवडे यांनी मानले. डॉ. विलास घुले आणि शांताराम सोनवणे यांनीही उपस्थितांना तांत्रिक मार्गदर्शन केले.