बाभळेश्‍वर कृषि विज्ञान केंद्र पंतप्रधान प्रक्रीया उद्योग उभारणीत राज्यात अव्वल!

संगमनेर Live
0
बाभळेश्‍वर कृषि विज्ञान केंद्र पंतप्रधान प्रक्रीया उद्योग उभारणीत राज्यात अव्वल!

◻️ ​२९१ शेतकरी, महिला व तरुणांना दिले उद्योगाभिमुख प्रशिक्षण

संगमनेर LIVE (​बाभळेश्‍वर) | केंद्र शासनाच्या पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेअंतर्गत ग्रामीण भागात उद्योजकतेचे जाळे विणण्यामध्ये बाभळेश्‍वर येथील कृषि विज्ञान केंद्राने (KVK) उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत केंद्राने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. 

शेतकरी, महिला बचत गट व युवकांना उद्योगाभिमुख प्रशिक्षण देऊन स्वावलंबनाकडे नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केंद्राने यशस्वीरित्या पार पाडले असून प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण दिल्याने या मोहिमेची व्याप्ती अधिकच वाढली आहे.

नामदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील आणि सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पायरेन्सच्या कृषि विज्ञान केंद्राने गेल्या वर्षभरात १२ विशेष प्रशिक्षणांचे आयोजन केले. यामध्ये २९१ शेतकरी, महिला बचत गट आणि युवकांना प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण देण्यात आले. या उपक्रमांतर्गत प्रामुख्याने फळ-भाजीपाला प्रक्रिया, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, मसाला उद्योग, बेकरी उत्पादने तसेच पापड आणि लोणचे निर्मिती यांसारख्या विविध अन्न प्रक्रिया क्षेत्रांत शेकडो लाभार्थ्याना दर्जेदार मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणामुळे अनेकांनी स्वतःचे सूक्ष्म उद्योग सुरू करून शाश्वत रोजगारनिर्मिती केली आहे.

बाभळेश्‍वर केंद्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी लाभार्थ्याना केवळ तांत्रिक प्रशिक्षण देऊन थांबवले नाही, तर प्रत्यक्ष उद्योग उभा करण्यासाठी लागणारी संपूर्ण साखळी सुलभ केली आहे. यामध्ये प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यापासून ते बॅक कर्ज मिळवून देणे, शासकीय अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आणि उत्पादित मालाचे ब्रॅडिंग व मार्केटिंग कसे करावे, याबाबत सखोल मार्गदर्शन केले जाते. यामुळे ग्रामीण भागातील महिला आणि तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहणे अत्यंत सोपे झाले असून महिला बचत गटांचे आर्थिक सबलीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे.

केंद्राच्या या उल्लेखनीय कामगिरीचे कृषि प्रक्रिया व नियोजन विभागाचे नोडल अधिकारी विनयकुमार आवटे यांनी विशेष अभिनंदन केले आहे. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे पाटील, संचालक डॉ. उत्तमराव कदम आणि सचिव डॉ. निलेश बनकर यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञ शैलेश देशमुख, शांताराम सोनवणे, डॉ. विलास घुले, डॉ. प्रियंका खर्डे, सज्जला लांडगे आणि डॉ. विठ्ठल विखे यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत.

“केंद्राच्या माध्यमातून कृषि उद्योजकता अभियान राबवण्यावर आम्ही सुरुवातीपासूनच भर दिला आहे. शेतमालाला योग्य दर मिळावा आणि त्याचे मूल्यवर्धन व्हावे हा आमचा प्रमुख उद्देश असून, या योजनेद्वारे ग्रामीण भागात नवउद्योजक तयार करून बाभळेश्‍वरने राज्यात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.” असे केंद्रांच्या वतीने सांगण्यात आले.

दरम्यान, स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या संधी आणि व्यवसायाचे साधन उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातून शहरांकडे होणारे युवकांचे स्थलांतर रोखण्यास या उपक्रमामुळे मोठी मदत मिळत आहे. बाभळेश्‍वर केंद्राचे हे ‘सक्सेस मॉडेल' आता इतर जिल्ह्यांसाठीही मार्गदर्शक ठरत असून, भविष्यात अधिकाधिक शेतकरी व युवकांनी या शासकीय योजनेचा लाभ घेऊन आत्मनिर्भर व्हावे, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !