◻️ सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमात अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ
नेवासे तालुक्यातील सुरेगाव रस्ता येथील सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रम येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तन महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचे पुष्प गुंफताना त्यांनी आदर्श जीवनपद्धतीवर सविस्तर प्रकाश टाकला.
कीर्तनादरम्यान महाराजांनी विहीर आणि पाण्याच्या टाकीचे अत्यंत प्रभावी उदाहरण दिले. ते म्हणाले, “विहिरीला जिवंत झरे असतात, त्यामुळे त्यातील पाणी निसर्गतः शुध्द राहते. याउलट टाकीतील पाणी शुध्द ठेवण्यासाठी ती वारंवार साफ करावी लागते. संतांचे विचार हे विहिरीच्या झऱ्यासारखे आहेत जे मानवी मनाला सतत शुध्द ठेवतात, तर सामान्यांचे ज्ञान हे साठवलेल्या पाण्यासारखे असते. संतांच्या आणि सामान्यांच्या ज्ञानात हाच मुख्य फरक आहे."
आजच्या सोशल मीडियाच्या युगावर भाष्य करताना महाराज पुढे म्हणाले की, “कीर्तन हे केवळ हसवण्यासाठी किंवा रडवण्यासाठी नसते, ते काम कलाकारांचे आहे. कीर्तन आणि प्रवचन हे समाजाला संस्कारित करून आदर्श जीवन जगण्याचे शिक्षण देणारे माध्यम आहे. त्यामुळे समाजाने केवळ ‘रील्स' पाहून कीर्तनकार निवडू नये, तर संबंधित कीर्तनकाराचा त्याग, अभ्यास आणि त्यांचे सामाजिक कार्य पाहूनच त्यांना साद घातली पाहिजे.”
संसार आणि परमार्थातील फरक स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, संसारात पुत्र जन्माला घालावा लागतो, पण परमार्थात पिता जन्माला घालावा लागतो. देव हा केवळ बाह्य डोळ्यांनी पाहण्याचा विषय नसून, तो अंतरीच्या ज्ञानाने डोळ्यांत पाहण्याचा विषय आहे. एकदा का ज्ञानाचे डोळे प्राप्त झाले की, माणसाला बाह्य जगाचा विसर पडतो. तसेच महंत उध्दव महाराज मंडलिक यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी सांगितले की, या आश्रमाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायासाठी तरुण साधक तयार करण्याचा एक ‘कारखानाच’ उभा केला असून त्यांच्यामध्ये सद्गुरु नारायणगिरी महाराजांचेच प्रतिबिंब उमटलेले दिसते.
कीर्तनानंतर विविध सेवा देणाऱ्या दात्यांचा महंत उध्दव महाराज मंडलिक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात अन्नदानाची मोठी परंपरा जोपासण्यात आली, ज्यामध्ये सकाळचा नाष्टाप्रसाद आरडगाव येथील बबनराव किसनराव इंगळे यांच्याकडून, दुपारचा भोजन प्रसाद वळण येथील बाबासाहेब रखमाजी खुळे आणि गोगलगाव येथील संपतराव, गणपतराव व रुस्तुम मते यांच्या वतीने देण्यात आला. तसेच सायंकाळचा महाप्रसाद कै. सौ. शशिकलाबाई व कै. उत्तमराव काशिनाथ शिंदे यांच्या स्मरणार्थ सुरेगाव येथील आप्पासाहेब व राजेंद्र शिंदे यांच्या वतीने देण्यात आला.
दरम्यान, या सोहळ्याला महाराष्ट्रातील अनेक नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.