वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर
◻️ ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांचा शिष्टमंडळात समावेश
या दौऱ्याचे नेतृत्व राज्याचे ज्येष्ठ नेते आणि नियामक मंडळाचे सदस्य बाळासाहेब थोरात व माजी मंत्री राजेश टोपे करणार आहेत. त्यांच्यासोबत कृषि क्षेत्रातील तज्ज्ञ शास्त्रज्ञांचा संच असून, यामध्ये मुख्य शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलक (पीक उत्पादन व संरक्षण), डॉ. कपिल सुशीर (ऊस प्रजनन विभाग) आणि रेणुजीवशास्त्र व जनुकीय अभियांत्रिकी विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अशोक जगताप यांचा समावेश आहे. हे उच्चस्तरीय शिष्टमंडळ ऑस्ट्रेलियातील आधुनिक कृषि पध्दतींचा सखोल अभ्यास करून महाराष्ट्रातील साखर उद्योगाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करणार आहे.
ऑस्ट्रेलियातील ‘शुगर रिसर्च ऑस्ट्रेलिया' ही संस्था ऊस उत्पादकता, नफा वाढविण्यामध्ये जगात आघाडीवर आहे. या भेटीदरम्यान ऊस जाती विकसित करण्याचा वेग वाढवण्यासाठी 'स्पीड ब्रीडिंग' सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास केला जाणार आहे. तसेच सतत बदलणाऱ्या हवामानाचा मुकाबला करू शकणाऱ्या रोगप्रतिकारक जातींचा विकास, साखर कारखान्यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी मिलिंग व प्रोसेसिंग तंत्रज्ञानातील सुधारणा आणि संशोधनाचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवणाऱ्या ऑस्ट्रेलियन यंत्रणेची पाहणी यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाईल.
या दौऱ्यात होणारा संभाव्य सामंजस्य करार हा प्रत्यक्षात आल्यास दोन्ही देशांमधील शास्त्रज्ञांना संयुक्त संशोधन प्रकल्पांवर एकत्र काम करण्याची संधी मिळेल. तसेच महाराष्ट्रातील शास्त्रज्ञांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळण्याचा आणि सुधारित ऊस वाणांची देवाणघेवाण अधिक सुलभ होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या सहकार्यामुळे महाराष्ट्रातील ऊस शेतीमध्ये आमूलाग्र बदल अपेक्षित आहेत.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी या दौऱ्याचे महत्त्व विषद करताना सांगितले की, “जगभरात साखर उद्योगात मोठी क्रांती झाली असून अनेक नवीन संशोधने समोर आली आहेत. या जागतिक संशोधनाचा थेट फायदा महाराष्ट्रातील सामान्य शेतकऱ्याला मिळावा आणि आपला साखर उद्योग जागतिक स्पर्धेत सक्षमपणे टिकून राहावा, हाच या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे.”
दरम्यान, हा दौरा महाराष्ट्रातील ऊस शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.