​राष्ट्रपती पदक विजेत्या तमाशा कलावंताच्या गाडीवर पुणे - नाशिक मार्गावर हल्ला

संगमनेर Live
0
​राष्ट्रपती पदक विजेत्या तमाशा कलावंताच्या गाडीवर पुणे - नाशिक मार्गावर हल्ला

◻️ महिला कलावंतांचा विनयभंग; ​वाहनाला कट मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून राडा

​संगमनेर LIVE | तमाशा कलेत आपल्या उत्कृष्ट योगदानाने सलग दोन वेळा ‘राष्ट्रपती सुवर्णपदक’ मिळवणाऱ्या दिवंगत विठाबाई भाऊ नारायणगावकर यांच्या तमाशा फडातील कलावंतांवर संगमनेर तालुक्यात जीवघेणा हल्ला झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. वाहनाला कट मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून १५ ते २० जणांच्या जमावाने कलावंतांना बेदम मारहाण केली. या अमानुष हल्ल्यात महिला कलावंतांचा विनयभंग करण्यात आला असून, सोन्याचे दागिने आणि पैशाची लुट देखील झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

​बुधवारी (दि. १) दुपारी दोन वाजेच्या सुमारास नाशिक - पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार शिवारात ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रातील लोककलावंतानी तीव्र संताप व्यक्त करत निषेध व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशा फडाचा ३१ मार्च रोजी संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्‍वर येथे कार्यक्रम होता. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्यानंतर, बुधवारी दुपारी हे सर्व कलावंत त्यांच्या बस आणि इतर वाहनांतून माळेगाव पठार येथील पुढील कार्यक्रमासाठी निघाले होते.

​वरुडी पठार परिसरातील एका पेट्रोल पंपावर वाहनांमध्ये इंधन भरल्यानंतर त्यांचा ताफा महामार्गाला लागला. याच वेळी एकाने कलावंतांच्या वाहनाला कट मारला. यानंतर त्या चालकाने पुढे जाऊन आपली गाडी तमाशाच्या बससमोर आडवी लावली आणि बस चालकाला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.

वाद सोडवण्यासाठी फडातील कलावंत खाली उतरले असता, त्या व्यक्तीने फोन करून १० ते १५ जणांच्या जमावाला तिथे बोलावून घेतले. या सशस्त्र जमावाने कोणत्याही प्रकारची दया न दाखवता फडातील कलावंतांना बेदम मारहाण केली. जमावाने तमाशाच्या बसच्या काचा फोडून मोठे नुकसान केले. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, यातील काहींनी महिला कलावंतांना मारहाण केली. तर, जातीवाचक शिवीगाळ करुन त्यांचा विनयभंग करण्यापर्यत त्यांची मजल गेली. 
या घटनेनंतर घारगाव पोलीस ठाण्यात जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत चार आरोपींना ताब्यात घेतले असून इतरही फरार आरोपींचा पोलीस कसून शोध घेत असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, ज्या विठाबाई नारायणगावकरांनी आपले संपूर्ण आयुष्य तमाशा कलेसाठी वेचले आणि महाराष्ट्राचे नाव देशभरात गाजवले, त्यांच्याच कुटुंबावर आणि कलावंतांवर असा हल्ला झाल्याने लोककला विश्‍वात खळबळ उडाली आहे. राज्यभरातील तमाशा आणि लोककलावंतांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला असून, सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी देखील केली आहे.

ज्या पायातल्या घुंगरांनी महाराष्ट्राची माती जागवली, त्याच घुंगरांना आज रक्ताचे डाग लागत आहेत. तमाशा फडावरील हल्ला हा केवळ एका फंडावरचा नव्हे, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेवर झालेला वार आहे. रात्रीच्या खेळात ज्यांच्या कलेवर आपण टाळ्यांचा पाऊस पाडतो, दिवसा ढवळ्या त्याच कलावंतांच्या पाठीवर जर लाठ्या पडत असतील, तर आपली 'संस्कृती' नक्की कुणाच्या दावणीला बांधली आहे? 

पोटाची खळगी भरण्यासाठी गाववेशीवर येणाऱ्या या उपेक्षित लोककलावंतांच्या नशिबी जर फक्त असुरक्षितताच येणार असेल, तर तो आपला सर्वात मोठा सामाजिक पराभव नाही का? ​घुंगरांच्या तालावर टाळ्या पिटणाऱ्या हातांनीच जर कलावंतांच्या अब्रूवर आणि जीवावर हल्ले करायचे असतील, तर महाराष्ट्राने आपली ‘सांस्कृतिक’ झूल आता कायमची उतरवून ठेवलेली बरी.

 आपली जत्रा सजवण्यासाठी, आपले मनोरंजन करण्यासाठी घरदार सोडून येणाऱ्या कलावंताच्या वाट्याला जर अपमान आणि रक्तच येणार असेल, तर ती संस्कृती नसून निखळ विकृती आहे. त्यामुळे मनोरंजनाची भूक भागवणाऱ्या या कलावंतांचे अश्रू पिणारी ही विकृती वेळीच ठेचून काढली नाही, तर एक दिवस महाराष्ट्राची लोककला फक्त पुस्तकातच उरेल, हे मात्र नक्की!
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !