बुवाबाज ३९ आमदारांच्या राजीनाम्यासाठी माकप आक्रमक

संगमनेर Live
0
बुवाबाज ३९ आमदारांच्या राजीनाम्यासाठी माकप आक्रमक

◻️ सोमवारी राज्यभर आंदोलन; प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘अंधश्रध्दा निर्मूलन कक्ष’ स्थापनेची मागणी 

​संगमनेर LIVE | राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या भोंदू बाबा अशोक खरात यांच्या भोंदूगिरीच्या जाळ्यात राज्यातील ३९ आमदार सामील असल्याचा गंभीर आरोप होत आहे. या पार्श्‍वभूमीवर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) आक्रमक पवित्रा घेतला असून, या आमदारांची नावे जाहीर करून त्यांचे राजीनामे घेण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी सोमवार, ६ एप्रिल २०२६ रोजी राज्यभर तालुका पातळीवर तीव्र आंदोलने करण्यात येणार आहेत.

​निवडून आलेले लोकप्रतिनिधी संविधानिक पदावर असतात आणि संविधानाने त्यांच्यावर वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारण्याची तसेच तो जनतेत रुजवण्याची महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. मात्र, ही संविधानिक जबाबदारी पार न पाडता या उलट वर्तन करणे म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्यात कसूर करणेच आहे. 

अशा लोकप्रतिनिधींच्या निमित्ताने तंत्र-मंत्र आणि जादू-टोणा यांसारख्या अंधश्रद्धेच्या गोष्टींना राजमान्यता मिळत असून, त्यामुळे सामान्य जनताही अशा भोंदूगिरीला बळी पडत आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मते, भोंदू बाबा जितके गुन्हेगार आहेत, तितकेच त्यांना समर्थन देणारे आणि आपल्या अनुयायांना अशा बाबांवर विश्वास ठेवण्यास प्रवृत्त करणारे लोकप्रतिनिधीही गुन्हेगार आहेत. त्यामुळे अशा सर्व दोषींवर तत्काळ कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.

​भोंदू बाबा अशोक खरात याच्या शोषणाला बळी पडलेल्या अनेक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात पसरत असून, यामुळे पीडित महिलांच्या सामाजिक प्रतिष्ठेला मोठी ठेच पोहोचत आहे. हे व्हिडिओ तातडीने हटवण्याची कारवाई सरकारने करावी, अशी मागणीही पक्षाने केली आहे. सध्या राज्यामध्ये भोंदू बाबांचे पीक आले असून, हे राज्यकर्त्यानी वैज्ञानिक दृष्टिकोनाऐवजी जाती आणि धर्मावर आधारित अंधश्रद्धेच्या राजकारणाला दिलेल्या बळाचेच परिणाम आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व भोंदू बाबांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारने विशेष मोहीम राबवावी.

​शासनाने प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ‘अंधश्रध्दा निर्मूलन कक्ष’ स्थापन करून ते कार्यान्वित करावे, जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम तयार करून त्याची कडक अंमलबजावणी करावी आणि सोशल मीडियावरून प्रसारित होणाऱ्या अंधश्रध्दा पसरवणाऱ्या जाहिरातींचे नियमन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तातडीने तयार करावी, अशा मागण्याही माकपच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

दरम्यान या सर्व महत्त्वाच्या मागण्यांसाठी सोमवार, ६ एप्रिल रोजी होणाऱ्या राज्यव्यापी आंदोलनात जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माकपचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !