महामानवाच्या जयंती उत्सवावर निर्बध? रिपाइंचे आश्‍वी पोलिसांना निवेदन

संगमनेर Live
0
महामानवाच्या जयंती उत्सवावर निर्बध? रिपाइंचे आश्‍वी पोलिसांना निवेदन

◻️ ​मिरवणुका आणि सभांना पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी

संगमनेर LIVE | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी करण्यावर प्रशासनाने कोणतेही निर्बध लादू नयेत. तसेच, जयंती उत्सवासाठी चोख पोलीस बंदोबस्त पुरवावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने आश्‍वी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांना सोमवारी (दि. १३) सायंकाळी निवेदन देण्यात आले.

या निवेदनाद्वारे रिपाइंने मागणी केली आहे की, जयंती उत्सवावर कोणतेही अघोषित किंवा चुकीचे निर्बध लादण्यात येऊ नयेत, उलट जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुका, अभिवादन कार्यक्रम आणि जाहीर सभांच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करून समाजविघातक शक्तींना आळा घालावा. प्रशासनाने आंबेडकरी जनतेच्या भावनांचा आदर करत कोणत्याही अटी शर्ती न घालता जयंती साजरी करण्यास रीतसर परवानगी द्यावी, जेणेकरून हा जयंती उत्सव उत्साहात पार पडेल.

रिपाइंचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी हे निवेदन आश्‍वी पोलीसांना देण्यात आले. यावेळी एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल बर्डे यांच्यासह तालुक्यातून आलेले दोन्ही संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, पोलीस प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक कार्यवाही करावी, अशी भावना यावेळी आंबेडकरी जनतेने व्यक्त केली.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिलनंतर जयंती साजरी करण्यास प्रशासनाने मनाई केल्याचा एक संदेश सध्या समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या संदेशामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये संभ्रमाचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. देश आणि राज्यासह संगमनेर तालुक्यात दरवर्षी महिनाभर विविध उपक्रमांनी महामानवाची जयंती साजरी केली जाते. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने कोणत्याही अटी-शर्तीशिवाय परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !