राहुरी पोटनिवडणूक ही थेट वंचित-भाजप लढत - ॲड. प्रकाश आंबेडकर
◻️ अशोक खरात नेमका कुणाचा नातेवाईक? हे विखे पाटलांनी जाहीर करावे
संगमनेर LIVE (राहुरी) | राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “ही लढत वंचित बहुजन आघाडी आणि भाजप यांच्यातच होत आहे. राष्ट्रवादी काॅग्रेसचा उमेदवार हा केवळ डमी आहे,” असा थेट आरोप करत त्यांनी निवडणुकीत नवे समीकरण मांडले.
ॲड. प्रकाश आंबेडकरांनी पुढे बोलताना शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. “ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच प्राजक्ता तनपुरे यांना उमेदवारी दिली नाही. भाजपने दबाव आणला, हा फक्त दिशाभूल करणारा प्रचार आहे,” असे ते म्हणाले. याचवेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित करत अजित पवार यांच्या कथित विमान अपघात प्रकरणाचा उल्लेख केला. “या प्रकरणात साधी एफआयआरही दाखल झाली नाही, यात काहीतरी काळेबेरे आहे का?” असा थेट सवाल त्यांनी केला.
घराणेशाहीवर प्रहार करत ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “घराणेशाही वाढली तर लोकशाही कमकुवत होते आणि हुकूमशाहीला खतपाणी मिळते.” त्यांनी मतदारांना सजग राहण्याचे आवाहन केले. तसेच मुस्लिम समाजाला १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन करत निवडणुकीत मोठा बदल घडवण्याचा इशारा दिला.
अशोक खरात प्रकरणावर बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकरांनी भाजप आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही गंभीर आरोप केले. “भोंदूगिरी आणि पारंपरिक व्यवसाय यात स्पष्ट फरक आहे. अंधश्रध्देच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” असे त्यांनी ठणकावले. तसेच “अशोक खरात नेमका कुणाचा नातेवाईक आहे, हे विखे पाटलांनी जाहीर करावे,” असे आव्हान देत त्यांच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, राहुरी पोटनिवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरूच असून, वंचित बहुजन आघाडी आणि भाजप यांच्यात थेट संघर्षाचे चित्र स्पष्ट होत आहे. आंबेडकरांच्या आक्रमक भूमिकेमुळे ही निवडणूक अधिकच रंगतदार आणि निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.