अक्षय कर्डिले यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करा - डॉ. सुजय विखे पाटील
◻️ ‘उबाठा’चे तालुकाप्रमुख सचिन म्हसे यांचा भाजपमध्ये प्रवेश
संगमनेर LIVE (राहुरी) | राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक ही केवळ राजकीय लढाई नसून ती स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेबांनी आयुष्यभर जपलेल्या कार्याला आणि त्यांनी जनतेमध्ये निर्माण केलेल्या विश्वासला खऱ्या अर्थाने न्याय देण्याची संधी असल्याचे प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
उंबरे व ब्राम्हणी गणातील महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या भव्य बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अक्षय कर्डिले यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करून विकासाची परंपरा अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सभेमध्ये बोलताना डॉ. विखे पाटील यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेचे कौतुक केले. राजकारणात अशा कठीण प्रसंगी घेतलेला निर्णय हा माणुसकी आणि राजकीय परिपक्वतेचे उदाहरण असल्याचे सांगत त्यांनी तनपुरे परिवाराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. राजकारणात सर्वसमावेशकता आणि कार्यकर्त्याची एकजूट हीच खरी ताकद असल्याचे नमूद करत त्यांनी कोणत्याही गटाच्या व्यक्तीची अवहेलना न करता सर्वानी एकदिलाने काम करण्याचा संदेश दिला. आगामी काळात मतदारसंघाची होणारी पुनर्रचना पाहता, क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि विकासाचे व्हिजन टिकवण्यासाठी ही निवडणूक अत्यंत निर्णायक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याच बैठकीदरम्यान राहुरी तालुक्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली. उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख सचिन म्हसे यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे महायुतीची ताकद राहुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाढली असून विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली जात असून, येत्या २३ तारखेला महायुतीला विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
दरम्यान या सभेमुळे कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून प्रचाराने आता वेग घेतला आहे.