संगमनेरशी जिव्हाळ्याचे नाते असणाऱ्या आशा भोसले काळाच्या पडद्याआड
◻️ पाहुणचार आणि प्रकट मुलाखतीच्या आठवणीने संगमनेरकर भावुक
संगमनेर LIVE | आपल्या जादुई आवाजाने मोहिनी घालणाऱ्या, पद्मभूषण गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ संगीत क्षेत्राचीच नव्हे, तर संगमनेर तालुक्याचीही मोठी वैयक्तिक हानी झाली आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात आणि संगमनेरकरांशी असलेले त्यांचे रेशमी नाते आज केवळ आठवणींच्या हिंदोळ्यावर उरले असून, तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंतीनिमित्त २०१४ मध्ये जाणता राजा मैदान येथे झालेला ‘आशा भोसले लाईव्ह कॉन्सर्ट’ संगमनेरच्या सांस्कृतिक इतिहासातील सुवर्णक्षण ठरला. सुमारे लाखभर प्रेक्षकांच्या साक्षीने पार पडलेल्या या सोहळ्यात आशाताईनी आपल्या स्वरांनी अवघ्या नगर जिल्ह्याला मंत्रमुग्ध केले होते. सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली त्यांची प्रकट मुलाखत आणि थोरात परिवारासोबतचा त्यांचा स्नेह आजही संगमनेरकरांच्या डोळ्यासमोर उभा राहतो.
कार्यक्रमाच्या वेळी बोलताना आशाताईनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे मुक्तकंठाने कौतुक केले होते. “यशवंतराव चव्हाण यांचा वारसा जोपासणारे बाळासाहेब हे महाराष्ट्राचे सुसंस्कृत आणि पारदर्शक नेतृत्व आहे,” अशा शब्दांत त्यांनी थोरात यांच्या कार्याचा गौरव केला होता. केवळ गौरवच नव्हे, तर “तुम्हाला महाराष्ट्रात मोठे काम करायचे आहे,” असा आशीर्वादही त्यांनी दिला होता, जो आज शब्दशः खरा ठरताना दिसत आहे.
आशाताईचा संगमनेरशी केवळ एका कार्यक्रमापुरता संबंध नव्हता, तर ते नाते कुटुंबासारखे जिव्हाळ्याचे होते. जानेवारी २०२३ मध्ये जेव्हा बाळासाहेब थोरात यांचा नागपूर येथे अपघात झाला, तेव्हा आशाताईनी स्वतः रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तसेच, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर थोरात यांनी मंगेशकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. अगदी २०२४ च्या जयंती महोत्सवाच्या वेळीही आशाताईनी फोनवरून संगमनेरकरांवर आपले प्रेम व्यक्त केले होते.
अमृतेश्वरच्या पावन भूमीत आपल्या सुरांचा सुगंध दरवळणाऱ्या आशाताईच्या निधनाने संगमनेरच्या सांस्कृतिक विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आपल्या ९२ वर्षाच्या प्रवासात त्यांनी दिलेली गाणी आणि संगमनेरला दिलेली भेट, हीच आता संगमनेरकरांसाठी मोठी शिदोरी उरली आहे. त्यामुळे स्वरांच्या या महामेरूला संपूर्ण संगमनेर तालुका आणि अमृत उद्योग समूहाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली! अर्पण करण्यात आली आहे.