धानोरे येथे ग्रामदैवत श्री धनेश्‍वर महाराजांच्या यात्रोत्सवाला उद्यापासून सुरवात

संगमनेर Live
0
धानोरे येथे ग्रामदैवत श्री धनेश्‍वर महाराजांच्या यात्रोत्सवाला उद्यापासून सुरवात

◻️​ अध्यात्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमासह कुस्त्यांचा जंगी आखाडा रंगणार 

संगमनेर LIVE (​सात्रळ) | राहुरी तालुक्यातील धानोरे येथील ग्रामदैवत श्री धनेश्‍वर देवस्थानचा देवभार यात्रा उत्सव पारंपरिक श्रध्दा, उत्साह आणि सांस्कृतिक वैभवाच्या संगमात साजरा होत आहे. उद्या सोमवार, दि. १३ एप्रिल आणि मंगळवार, दि. १४ एप्रिल अशा दोन दिवसांच्या कालावधीत हा यात्रोत्सव पार पडणार असून, ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीने या सोहळ्याची तयारी पूर्ण केली आहे. 

उद्या ​यात्रेच्या पहिल्या दिवशी, सोमवारी सकाळी श्री धनेश्‍वर देवतेचा मंगलमय दुग्धाभिषेक आणि विधीवत पूजा संपन्न होणार आहे. त्यानंतर सायंकाळी पारंपरिक काठीची सनईच्या सुरात आणि विविध वाद्यांच्या गजरात गावातून भव्य मिरवणूक काढली जाईल. या मिरवणुकीनंतर आकाशात फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी करण्यात येणार असून, रात्री महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीची ओळख असलेला बहारदार लावणी कार्यक्रम आयोजित केला आहे. 

​उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारी दुपारी कुस्त्यांच्या जंगी आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये परिसरातील आणि राज्यातील अनेक नामांकित पैलवानांच्या रोमांचक लढती पाहण्याची संधी कुस्तीप्रेमींना मिळणार आहे. त्यामुळे कुस्तीप्रेमींमध्ये मोठे कुतूहल निर्माण झाले असून, मल्लांच्या या थरारामुळे यात्रेची रंगत अधिकच वाढणार आहे.

यात्रेनिमित्त धनेश्‍वर देवस्थान आणि घाट परिसरात मोठी बाजारपेठ सजली असून, लहानांपासून थोरांपर्यत सर्वासाठी खेळणी दुकाने, मोठे राहाटपाळणे आणि करमणुकीची विविध साधने उभारण्यात आली आहेत.

या यात्रोत्सवासाठी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री धनेश्‍वर महाराजांच्या यात्रोत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन धनेश्‍वर देवस्थान ट्रस्ट, सर्व युवक तरुण मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. अशी माहिती पत्रकार समर्थ वाकचौरे यांनी कळवली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !